Acts 23

Bu bölümü AI ile başlat

Bu bölüm hakkında AI'ye sor

Metinde kal ve hareket, gerilim, arka plan ve bu bölümün daha büyük kitap içinde ne açığa çıkardığı hakkında sor.

1 मग पौल न्यायसभेकडे स्थिर दृष्टी करून म्हणाला, “बंधुजनहो, मी आजपर्यंत देवाबरोबर पूर्ण सद्भावाने वागत आलो आहे.” 2 तेव्हा महायाजक हनन्या ह्याने त्याच्याजवळ उभे राहणाऱ्यांस त्याच्या तोंडात मारण्याची आज्ञा केली. 3 तेव्हा पौल त्यास म्हणाला, “हे चुना लावलेल्या भिंती, तुला देव मारील; तू नियमशास्त्राप्रमाणे माझा न्याय करावयाला बसला असता नियमशास्त्राविरुद्ध मला मारण्याची आज्ञा देतोस काय?” 4 तेव्हा जवळ उभे राहणारे म्हणाले, “तू देवाच्या महायाजकाची निंदा करितोस काय?” 5 पौलाने म्हटले, “बंधुजनहो, हा महायाजक आहे हे मला ठाऊक नव्हते; कारण तू आपल्या लोकांच्या अधिकाऱ्याविरुद्ध वाईट बोलू नको असे शास्त्रात लिहिले आहे.” 6 तेव्हा त्यांच्यामध्ये एक भाग सदूकी व एक भाग परूशी आहे, हे ओळखून पौल न्यायसभेमध्ये मोठ्याने म्हणाला, “बंधुजनहो, मी परूशी व परुश्यांचा पुत्र आहे; आमची आशा व मरण पावलेल्यांचे पुनरुत्थान ह्यासंबंधाने माझी चौकशी होत आहे.” 7 तो हे बोलत आहे तोंच परूशी व सदूकी ह्यांच्यात भांडण लागून लोकात फुट पडली. 8 कारण पुनरुत्थान नाही आणि देवदूत व आत्माही नाही, असे सदूकी म्हणतात; परूशी तर या दोन्ही गोष्टी मान्य करतात. 9 तेव्हा मोठी गडबड उडाली; आणि जे नियमशास्त्र शिक्षक, परूश्यांच्या पक्षाचे होते त्यांच्यातून काहीजण उठून तणतण करीत म्हणाले, “या मनुष्याच्या ठायी आम्हास काही वाईट दिसत नाही; जर आत्मा किंवा देवदूत त्यांच्याबरोबर बोलला असेल तर मग कसे?” 10 असे त्यांच्यात जोराचे भांडण चालले असता; ते पौलाला फाडून टाकतील असे भय वाटून सरदाराने शिपायांना हुकुम केला की, खाली जाऊन त्यास त्यांच्यामधून सोडवून गढीत आणावे. 11 त्याच रात्री प्रभू त्याच्यापुढे उभा राहून म्हणाला, “धीर धर; जशी तू यरूशलेमे शहरात माझ्याविषयी साक्ष दिली तशी रोम शहरांतही तुला द्यावी लागेल.” 12 मग दिवस उगवल्यावर, कित्येक यहूदी एकजूट करून शपथबद्ध होऊन म्हणाले, पौलाचा जीव घेईपर्यंत आम्ही खाणार पिणार नाही. 13 हा कट रचणारे इसम चाळीसांहून अधिक होते. 14 ते मुख्य याजक लोक व वडील ह्यांच्याकडे येऊन म्हणाले, “पौलाचा जीव घेईपर्यंत आम्ही अन्नाला शिवणार नाही, अशा कडकडीत शपथेने आम्ही आपणास बद्ध करून घेतले आहे. 15 तर आता त्याच्याविषयी आणखी काही बारकाईने विचारपूस करावयाची आहे, या निमित्ताने त्यास आपणाकडे आणावे असे तुम्ही न्यायसभेतही सरदाराला समजवावे; म्हणजे तो जवळ येतो न येतो तोंच त्याचा जीव घेण्यास आम्ही तयार आहोत.” 16 तेव्हा ते दबा धरून बसल्याचे पौलाच्या बहिणीच्या मुलाने ऐकले आणि गढीत जाऊन त्याने पौलाला सांगितले. 17 तेव्हा पौलाने एका शताधीपतीला बोलावून म्हटले, या तरुणाला सरदाराकडे घेऊन जा, ह्याला त्यास काही सांगावयाचे आहे. 18 तेव्हा त्याने त्यास सरदाराकडे नेऊन म्हटले, बंदिवान पौल ह्याने मला बोलावून विनंती केली की, या तरूणाला आपणाकडे आणावे, त्यास आपणाबरोबर काही बोलावयाचे आहे. 19 तेव्हा सरदाराने त्याचा हात धरून त्यास एकीकडे नेऊन विचारले, “तुला काय सांगावयाचे आहे?” 20 तो म्हणाला, “यहूद्यांनी असा एकोपा केला आहे की, पौलाविषयी आणखी काही बारकाईने विचारपूस करावयाच्या निमित्ताने त्यास उद्या खाली सभेमध्ये आणावे, अशी आपणाला विनंती करावी. 21 तर आपण त्यांचे ऐकू नका; कारण त्यांच्यापैकी चाळीसांहून अधिक माणसे त्याच्यासाठी दबा धरून बसली आहेत; त्यांनी शपथ घेतली आहे की, त्यास जिवे मारीपर्यंत आपण खाणार पिणार नाही; आणि आता ते तयार होऊन आपल्या संमतीची वाट पाहत आहे.” 22 तेव्हा, “तू हे मला कळविले आहे हे कोणाला सांगू नको, असे त्या तरूणाला निक्षून सांगून सरदाराने त्यास निरोप दिला.” 23 मग त्याने दोघा शताधिपतींना बोलावून सांगितले, “कैसरीयास जाण्यासाठी दोनशे शिपाई, सत्तर स्वार व दोनशे भालेकरी प्रहर रात्रीस तयार ठेवा.” 24 आणि पाठाळे मिळवा, त्यावर पौलाला बसवून फेलिक्स सूभेदाराकडे सांभाळून न्या. 25 शिवाय त्याने अशा मजकूराचे पत्र लिहिले. 26 “महाराज फेलिक्स ह्यांना सुभेदार क्लौद्य लुसिया याचा सलाम. 27 या मनुष्यास यहूद्यांनी धरले होते आणि त्यांच्याकडून त्याचा घात होणार होता, इतक्यात हा रोमी आहे असे कळाल्यावरून मी शिपाई घेऊन जाऊन त्यास सोडवले. 28 आणि ह्याच्यावर आरोप आणण्याचे काय कारण होते हे समजून घेण्याच्या इच्छेने त्यास त्यांच्या न्यायसभेत खाली नेले. 29 तेव्हा त्यांच्या नियमशास्त्रातील वादग्रस्त गोष्टींसंबंधी त्याच्यावर काही ठपका आणला होता, परंतु मरणाची किंवा बंधनाची शिक्षा देण्याजोगा आरोप त्याच्यावर नव्हता, असे मला दिसून आले. 30 या मनुष्या विरुद्ध कट होणार आहे अशी मला खबर लागताच मी त्यास आपल्याकडे पाठवले आहे, वादींनाही आपल्यासमोर खटला चालवण्यास सांगितले आहे, सुखरूप असावे.” 31 शिपायांनी हुकुमाप्रमाणे पौलाला रात्री अंतिपत्रिसास नेले. 32 आणि दुसऱ्या दिवशी त्याच्याबरोबर जाण्यास स्वार ठेवून ते गढीत परत आले. 33 कैसरीयात गेल्यावर स्वारांनी सुभेदाराला पत्र देऊन पौलाला त्याच्यापुढे उभे केले. 34 पत्र वाचून त्याने विचारले, हा कोणत्या प्रांताचा आहे; तो किलीकीयाचा आहे समजल्यावर, 35 त्याने म्हटले, “तुझे वादी आले म्हणजे मी तुझे म्हणणे ऐकेन.” आणि ‘त्याला हेरोदाच्या राजवाड्यात ठेवावे’ असा त्याने हुकुम सोडला.

Okumayı gerçek bir çalışmaya dönüştür

Ayet kaydetmek, not almak ve YZ destekli araçlarla çalışmak için kayıt ol.

Bu bölümden sonraki adımınızı seçin Okumaya devam et, bir plan seç veya AI ile çalışmaya devam et.
Bu bölümün açtığı temaları takip et Bu bölümün açmış olabileceği daha büyük sorular için ilgili konu merkezleri.