Luke 14

הישאר בטקסט ושאל על התנועה, המתח, הרקע ומה שהפרק הזה מגלה בתוך הספר הגדול יותר.

1 एका शब्बाथ दिवशी तो परूश्यांच्या अधिकाऱ्यांपैकी एकाच्या घरी जेवावयास गेला, तेव्हा तेथे जमलेले लोक येशूवर बारकाईने नजर ठेवून होते. 2 आणि तेथे त्याच्यासमोर जलोदर झालेला एक मनुष्य होता. 3 येशूने नियमशास्त्र शिक्षकांना व परूश्यांना विचारले, “शब्बाथ दिवशी बरे करणे नियमशास्त्राला धरुन आहे की नाही?” 4 परंतु ते गप्पच राहिले. तेव्हा येशूने त्या आजारी मनुष्यास धरुन त्यास बरे केले व त्यास पाठवून दिले. 5 मग तो त्यांना म्हणाला, “जर तुमच्यापैकी एखाद्याला एक मुलगा किंवा एक बैल आहे व तो विहीरीत पडला, तर शब्बाथ दिवशी तुम्ही त्यास ताबडतोब बाहेर काढणार नाही काय?” 6 आणि या प्रश्नाला उत्तर देणे त्यांना जमले नाही. 7 नंतर, आमंत्रित पाहुणे स्वतःसाठी मानाच्या जागा कसे निवडून घेत होते हे पाहून, त्याने त्यांना एक दाखला सांगितला, तो म्हणाला, 8 “जेव्हा एखादा तुम्हास लग्नाच्या मेजवानीला आमंत्रित करील, तेव्हा मानाच्या आसनावर बसू नका कारण तुमच्यापेक्षा अधिक महत्त्वाच्या मनुष्यास त्याने कदाचित आमंत्रण दिले असेल. 9 मग ज्याने तुम्हा दोघांना आमंत्रित केले आहे तो येईल आणि तुम्हास म्हणेल, या मनुष्यास तुझी जागा दे. मग अपमानित होऊन तुम्हास खालच्या जागी बसावे लागेल. 10 पण जेव्हा तुम्हास आमंत्रित केलेले असेल, तेव्हा जा आणि अगदी खालच्या जागी जाऊन बसा. यासाठी की, जेव्हा यजमान येईल, तेव्हा तो तुम्हास म्हणेल, मित्रा, वरच्या आसनावर येऊन बस. तेव्हा तुझ्या पाहुण्यांसमोर तुझे गौरव होईल. 11 कारण जो कोणी स्वतःला उंच करतो तो नमवला जाईल व जो स्वतःला नमवतो तो उंच केला जाईल.” 12 मग ज्याने आमंत्रण दिले होते त्यास तो म्हणाला, “तू जेव्हा दुपारी किंवा संध्याकाळी भोजनास बोलावशील तेव्हा तुझ्या मित्रांना, भावांना, तुझ्या नातेवाईकांना किंवा श्रीमंत शेजाऱ्यांना बोलावू नको, कारण तेही तुला परत आमंत्रण देतील व अशा रीतीने तुझ्या आमंत्रणाची परतफेड केली जाईल. 13 पण जेव्हा तू मेजवानी देशील, तेव्हा गरीब, लंगडे, पांगळे, आंधळे यांना आमंत्रण दे. 14 म्हणजे तू धन्य होशील, कारण तुझी परतफेड करण्यासाठी त्यांच्याकडे काहीही नाही. तर नीतिमानांच्या पुनरुत्थानाच्या वेळी तुझी परतफेड होईल.” 15 मेजाभोवती बसलेल्यांपैकी एकाने जेव्हा हे ऐकले, तेव्हा तो येशूला म्हणाला, “जो देवाच्या राज्यात भाकर खाईल, तो प्रत्येकजण धन्य.” 16 मग येशू त्यास म्हणाला, “एक मनुष्य एका मोठ्या मेजवानीची तयारी करीत होता. त्याने पुष्कळ लोकांस आमंत्रण दिले. 17 भोजनाच्या वेळी ज्यांना आमंत्रण दिले होते त्यांना ‘या कारण सर्व तयार आहे’ असा निरोप सांगण्यासाठी नोकराला पाठवले. 18 ते सर्वजण सबब सांगू लागले. पाहिला त्यास म्हणाला, ‘मी शेत विकत घेतले आहे आणि मला जाऊन ते पाहिले पाहिजे. कृपाकरून मला क्षमा कर.’ 19 दुसरा म्हणाला, ‘मी बैलाच्या पाच जोड्या विकत घेतल्या आहोत व त्यांची पारख करण्यासाठी मी चाललो आहे, कृपाकरून मला क्षमा कर.’ 20 आणखी तिसरा म्हणाला, ‘मी लग्न केले आहे व त्यामुळे मी येऊ शकणार नाही.’ 21 तो नोकर परत आला व त्याने आपल्या मालकाला या गोष्टी सांगितल्या. मग घराचा मालक रागावला आणि नोकराला म्हणाला, ‘बाहेर रस्त्यावर आणि नगरातल्या गल्ल्यांमध्ये लवकर जा व गरीब, आंधळे, असहाय्य, लंगडे यांना घेऊन इकडे ये!’ 22 नोकर म्हणाला, ‘मालक, आपल्या आज्ञेप्रमाणे केले आहे आणि तरीही आणखी जागा रिकाम्या आहे.’ 23 मालक नोकराला म्हणाला, ‘रस्त्यावर जा, कुंपणाजवळ जा आणि तेथे असलेल्या लोकांस आग्रहाने आत येण्यास सांग म्हणजे माझे घर भरून जाईल. 24 कारण मी तुम्हास सांगतो की, त्या आमंत्रित मनुष्यांपैकी एकालाही माझ्या जेवणातले काही चाखायला मिळणार नाही.” 25 मोठ्या संख्येने लोक येशूबरोबर चालत होते. तो त्यांच्याकडे वळाला व म्हणाला, 26 “जर कोणी माझ्याकडे येतो आणि आपले वडील, आई, पत्नी, मुले, भाऊ, बहिणी एवढेच नव्हे, तर स्वतःच्या जीवाचासुद्धा द्वेष करीत नाही, तर तो माझा शिष्य होऊ शकत नाही. 27 जो कोणी स्वतःचा वधस्तंभ घेऊन माझ्यामागे येणार नाही, तो माझा शिष्य होऊ शकणार नाही. 28 जर तुम्हापैकी कोणाला बुरुज बांधायचा असेल तर तो अगोदर बसून खर्चाचा अंदाज करून तो पूर्ण करावयास त्याच्याजवळ पुरेसे पैसे आहे की नाही हे पाहणार नाही काय? 29 नाही तर कदाचित तो पाया घालील आणि पूर्ण करू शकणार नाही आणि जे पाहणारे आहेत ते त्याची थट्टा करतील आणि म्हणतील, 30 या मनुष्याने बांधण्यास सुरुवात केली पण पूर्ण करू शकला नाही! 31 किंवा एक राजा दुसऱ्या राजाबरोबर लढाई करण्यास निघाला, तर तो अगोदर बसून याचा विचार करणार नाही का? की, त्याच्या दहा हजार मनुष्यांनिशी त्याच्या शत्रूशी, जो वीस हजार सैन्यानिशी चालून येत आहे, त्यास त्याचा सामना करता येणे शक्य आहे काय? 32 जर तो त्यास तोंड देऊ शकणार नसेल, तर त्याचा शत्रू दूर अंतरावर असतानाच तो मध्यस्थ पाठवून शांततेसाठी सलोख्याचे बोलणे सुरू करील. 33 त्याच प्रकारे तुमच्यापैकी जो कोणी सर्वस्वाचा त्याग करीत नाही त्यास माझा शिष्य होता येणार नाही. 34 मीठ चांगले आहे, पण मिठाची जर चव गेली, तर त्यास खारटपणा कशाने येईल? 35 ते जमिनीच्या किंवा खताच्याही पूर्णपणे निरुपयोगी ठरेल व लोक ते फेकून देतील. ज्याला ऐकायला कान आहेत तो ऐको.”

הפוך קריאה ללימוד ממשי

הירשמו כדי לשמור פסוקים, לרשום הערות וללמוד עם כלי AI.

בחר את הצעד הבא אחרי הפרק הזה המשך לקרוא, בחר תכנית או המשך ללמוד עם AI.
עקוב אחר הנושאים שהפרק הזה פותח מרכזי נושאים קשורים לשאלות הגדולות שהפרק הזה יכול לפתוח.