Leviticus 13

הישאר בטקסט ושאל על התנועה, המתח, הרקע ומה שהפרק הזה מגלה בתוך הספר הגדול יותר.

1 परमेश्वर मोशे व अहरोन यांना म्हणाला, 2 एखाद्या मनुष्याच्या अंगावरील कातडीला सूज, खवंद किंवा तकतकीत डाग असेल व तो महारोगाच्या चट्ट्यासारखा दिसत असेल तर त्यास अहरोन याजकाकडे किंवा त्याच्या याजक मुलांपैकी एकाकडे न्यावे. 3 मग याजकाने त्याच्या अंगाच्या कातडीवरील तो चट्टा तपासावा व त्या चट्ट्यावरील केस पांढरे झाले असल्यास व तो चट्टा कातडीपेक्षा खोल गेलेला दिसल्यास तो महारोगाचा चट्टा समजावा; मग त्या मनुष्याची तपासणी झाल्यावर याजकाने त्यास अशुद्ध ठरवावे. 4 त्या मनुष्याच्या अंगाच्या कातडीवरील डाग पांढरा असेल पण त्याच्या कातडीपेक्षा तो खरोखर खोल गेलेला नसेल व त्यावरील केस पांढरे झालेले नसतील तर याजकाने त्या चट्टा पडलेल्या मनुष्यास सात दिवस इतर मनुष्यापासून वेगळे एकटे ठेवावे. 5 सातव्या दिवशी याजकाने परत त्याची तपासणी करावी आणि तो चट्टा जसाच्या तसाच असून कातडीत पसरला नाही असे त्यास दिसून आले तर याजकाने त्यास आणखी सात दिवस इतरापासून वेगळे ठेवावे. 6 सातव्या दिवसानंतर याजकाने पुन्हा त्याची तपासणी करावी आणि चट्टा जर बुजत चालला असेल व तो कातडीत पसरला नसेल तर याजकाने त्यास शुद्ध ठरवावे; ते साधे खवंद होय; त्या मनुष्याने आपली वस्त्रे धुवावी आणि पुन्हा शुद्ध व्हावे. 7 परंतु त्या मनुष्याने स्वत:ला शुद्ध ठरवण्यासाठी याजकाला दाखविल्यानंतर त्याच्या कातडीवरील ते खवंद पसरत गेले असेल तर मग त्याने पुन्हा याजकापुढे हजर व्हावे. 8 याजकाने त्याची तपासणी करावी आणि ते खवंद कातडीत पसरल्याचे दिसून आल्यास त्याने त्यास अशुद्ध ठरवावे; तो महारोग होय. 9 एखाद्या मनुष्यास महारोगाचा चट्टा असेल तर त्यास याजकाकडे न्यावे. 10 याजकाने त्यास तपासावे; आणि जर त्याच्या कातडीच्या पांढऱ्या चट्ट्यावर सूज आली असेल व तेथील केस पांढरे झाले असतील व सुजेच्या जागेवरील मांस हुळहुळे झाले असेल तर 11 त्याच्या कातडीतला तो जुनाट महारोग होय; याजकाने त्यास अशुद्ध ठरवावे; अधिक तपासणीसाठी त्यास काही काळासाठी इतरापासून वेगळे ठेवू नये, कारण तो अशुद्धच आहे. 12 एखाद्या मनुष्याच्या कातडीला कोड फुटून तो डोक्यापासून पायापर्यंत अंगभर सर्व कातडीवर पसरला असेल तर याजकाने त्यास अंगभर तपासावे, 13 याजकाने त्याची तपासणी करावी त्याचा कोड अंगभर पसरल्याचे त्यास दिसून आले तर त्याने त्यास शुद्ध ठरवावे; त्याचे सर्व अंग पांढरे झाले आहे म्हणजे तो शुद्ध आहे. 14 पण त्याच्या अंगावर काही मांस कोवळे असेल तर तो अशुद्ध समजावा. 15 याजकाने कोवळे मांस पाहून त्यास अशुद्ध ठरवावे; असले कोवळे मांस अशुद्धच असते; तो महारोग होय. 16 परंतु ते कोवळे मांस जर परत पांढरे झाले तर त्याने परत याजकाकडे यावे; 17 याजकाने पुन्हा त्यास तपासावे आणि जर त्याचा चट्टा परत पांढरा झाला असेल तर त्याने त्या मनुष्यास शुद्ध ठरवावे; तो शुद्ध आहे. 18 कोणाच्या कातडीला फोड येऊन तो बरा झाला 19 व फोडाच्या जागी पांढरी सूज आली किंवा पांढरा तकतकीत लाल रेषा असलेला डाग पडला तर त्याने तो याजकाला दाखवावा. 20 याजकाने त्यास तपासावे आणि जर ती जागा कातडीपेक्षा खोल गेलेली दिसली व त्यावरील केस पांढरे झाले असले तर त्याने त्यास अशुद्ध ठरवावे; फोडातून बाहेर पडलेला हा महारोगाचा चट्टा आहे. 21 पण तपासणी केल्यावर त्यावरचे केस पांढरे झालेले नाहीत व ती जागा कातडीपेक्षा खोल गेलेली नाही तसेच ती बुजून पुसट होत चाललेली आहे असे याजकाला दिसून आले तर त्याने त्यास सात दिवस वेगळे ठेवावे. 22 त्यानंतर तो कातडीवर पसरत गेला आहे असे दिसले तर याजकाने त्या मनुष्यास अशुद्ध ठरवावे; तो चट्टा आहे. 23 पण तो तकतकीत डाग तेथल्या तेथेच राहून पसरला नाहीतर तो फोडाचा वण आहे, म्हणून याजकाने त्या मनुष्यास शुद्ध ठरवावे. 24 एखाद्याच्या कातडीत जळाल्याचा वण असेल व त्या वणाच्या कोवळ्या मांसात तांबूस-पांढरा किंवा पांढरा डाग दिसून येईल. 25 तर याजकाने त्यास तपासावे; त्या तकतकीत डागावरील केस पांढरे झाले असतील व कातडीपेक्षा ती जागा खोल गेलेली दिसत असेल तर त्या जळलेल्या जागी महारोग फुटला आहे; मग याजकाने त्यास अशुद्ध ठरवावे; तो महारोगाचा चट्टा होय. 26 परंतू तपासल्यावर त्या डागावरचे केस पांढरे झालेले नाहीत व ती जागा कातडीपेक्षा खोल गेलेली नाही आणि ती पुसट होत चालली आहे असे याजकाला दिसून आले तर त्याने त्यास सात दिवस वेगळे ठेवावे. 27 सातव्या दिवशी त्याने त्यास तपासावे व त्याचा डाग कातडीवर पसरत गेला आहे असे दिसले तर याजकाने त्या मनुष्यास अशुद्ध ठरवावे; तो महारोगाचा चट्टा होय; 28 परंतु तो डाग तेथल्या तेथेच असून कातडीवर पसरला नाही व तो पुसट होत चालला आहे असे दिसून आल्यास ती जळलेल्या जागेची सूज आहे म्हणून याजकाने त्यास शुद्ध ठरवावे; तो त्या जळलेल्या जागेवरचा वण होय. 29 एखाद्या पुरुषाच्या किंवा स्त्रीच्या डोक्यावर किंवा हनुवटीवर चट्टा असला, 30 तर याजकाने त्याची तपासणी करावी आणि ती जागा कातडीपेक्षा खोल दिसली व तिच्यावर काही पिंगट बारीक केस असले तर त्याने त्या व्यक्तीला अशुद्ध ठरवावे; ही चाई म्हणजे तो डोक्याचा किंवा हनुवटीचा महारोग होय. 31 तो चाईचा चट्टा कातडीपेक्षा खोल नसला व त्याच्यावर काळे केस नसले तर चाईचा चट्टा असलेल्या व्यक्तीला याजकाने सात दिवस वेगळे ठेवावे. 32 सातव्या दिवशी याजकाने त्या चट्ट्याची तपासणी करावी; ती चाई पसरली नाही, त्या जागी पिंगट केस नाहीत व ती जागा कातडीपेक्षा खोल गेलेली दिसली नाही, 33 तर त्या मनुष्याने आपल्या डोक्याचे केस काढावेत; पण चाईवरचे केस काढू नयेत; याजकाने चाई असलेल्या त्या मनुष्यास आणखी सात दिवस वेगळे ठेवावे. 34 सातव्या दिवशी याजकाने ती चाई पुन्हा तपासून पाहावी आणि चाई कातडीवर पसरलेली नसली व कातडीपेक्षा ती खोल गेलेली नसली तर याजकाने त्यास शुद्ध ठरवावे; त्या मनुष्याने आपले कपडे धुवावे व शुद्ध व्हावे. 35 परंतु तो शुद्ध ठरल्यानंतर ती चाई पसरत गेली 36 तर याजकाने त्यास तपासावे व ती चाई कातडीवर पसरलेली दिसली तर पिंगट केस शोधीत न बसता त्या मनुष्यास अशुद्ध ठरवावे. 37 परंतु ती चाई होती तेवढीच असेल व तिच्यावर काळे केस येत आहेत असे त्यास दिसून आले तर ती चाई बरी झाली आहे व तो मनुष्य शुद्ध झाला आहे; याजकाने त्यास शुद्ध ठरवावे. 38 कोणा पुरुषाच्या किंवा स्त्रीच्या अंगावर पांढरे डाग असतील. 39 तर याजकाने ते तपासावे व त्या व्यक्तीच्या अंगावरील ते डाग करडे असतील तर ती कातडीवर फुटलेली दाद होय. ती व्यक्ती शुद्ध होय. 40 कोणा मनुष्याचे केस गळून पडू लागले तर ते केवळ टक्कल आहे; तो मनुष्य शुद्ध होय. 41 त्याच्या डोक्याच्या बाजूचे केस गळू लागले तरी ते एक प्रकारचे टक्कल होय; तो मनुष्य शुद्ध आहे. 42 परंतु त्या टक्कल पडलेल्या डोक्यावरील चामडीवर तांबूस पांढरा चट्टा पडलेला असेल तर त्याच्या डोक्यावर महारोग फुटत आहे. 43 मग याजकाने त्यास तपासावे आणि त्याच्या टक्कल पडलेल्या डोक्याच्या भागावर, अंगावरील कातडीच्या महारोगासारखा तांबूस पांढरा चट्टा पडलेला असल्याचे दिसले, 44 तर त्या मनुष्याच्या डोक्यावर पडलेला चट्टा महारोगाचा होय; तो मनुष्य अशुद्ध होय; याजकाने त्यास अशुद्ध ठरवावे. 45 ज्या मनुष्यास महारोग झालेला आहे त्याचे कपडे फाटके असावे; त्याने आपले केस मोकळे सोडावे, आपले तोंड झाकावे व इतर लोकांस इशारा देण्यासाठी अशुद्ध, अशुद्ध असे ओरडत जावे. 46 जोपर्यंत त्याच्या अंगावर चट्टा असेल तितक्या दिवसापर्यंत त्याने अशुद्ध रहावे; तो अशुद्ध होय; त्याने एकटे रहावे; त्याची वस्ती छावणीबाहेर असावी. 47 “एखाद्या लोकरीच्या किंवा सणाच्या वस्त्राला महारोगाचा चट्टा पडला, 48 किंवा तो सणाच्या किंवा लोकरीच्या ताण्याला किंवा बाण्याला, चमड्याला किंवा चामड्याच्या वस्तुला पडला. 49 आणि त्या वस्त्राला, त्याच्या ताण्याला किंवा त्याच्या बाण्याला अथवा चामड्याला किंवा चामड्याच्या कोणत्याही वस्तूचा चट्टा हिरवट किंवा तांबूस असला तर तो महारोगाचा चट्टा होय; तो याजकाला दाखवावा. 50 याजकाने तो चट्टा तपासावा; चट्टा पडलेली ती वस्तू त्याने सात दिवस वेगळी करून ठेवावी. 51 त्याने सातव्या दिवशी तो चट्टा तपासावा आणि चामड्यावर किंवा वस्त्राचा ताण्यावर किंवा बाण्यावर अथवा चामड्याच्या कोणत्याही वस्तूवर तो चट्टा पसरलेला दिसला तर ते वस्त्र किंवा चामडे अशुद्ध आहे, चरत जाणारे कुष्ठ आहे. 52 ते वस्त्र लोकरीचे असो किंवा सणाचे असो त्याच्या ताण्यावर किंवा बाण्यावर, तसेच चामड्यावर किंवा चामड्याच्या एखाद्या वस्तूवर तो चट्टा असला तर याजकाने ते वस्त्र किंवा चामडे जाळून टाकावे. 53 परंतु तो चट्टा पसरला नाही असे याजकाला दिसून आले तर ते वस्त्र किंवा चामडे अवश्य धुतले पाहिजे. 54 याजकाने लोकांस ते वस्त्र किंवा चामडे धुण्यास सांगावे. मग धुवून झाल्यावर ते त्याने आणखी सात दिवस वेगळे ठेवावे. 55 त्यानंतर याजकाने पुन्हा त्याची तपासणी करावी, आणि जर तो आहे तसाच असला व जरी पसरलेला नसला तरी तो अशुद्ध समजावा आणि ते वस्त्र किंवा चामडे अग्नीत जाळून टाकावे. 56 परंतु धुतल्यावर तो चट्टा पुसट झाला आहे असे याजकाला दिसून आले तर त्याने त्या वस्त्राचा किंवा चामड्याचा अथवा ताण्याचा किंवा बाण्याचा भाग फाडून टाकावा. 57 इतके केल्यावरही जर त्या वस्त्रावर, त्याच्या ताण्यावर किंवा बाण्यावर अथवा चामड्याच्या कोणत्याही वस्तूवर तो चट्टा पुन्हा आला तर तो चट्टा चरत व पसरत आहे असे समजून ते चामडे किंवा वस्त्र अवश्य जाळून टाकावे. 58 परंतु तो चट्टा धुतल्यानंतर पुन्हा आला नाही तर ते चामडे किंवा वस्त्र शुद्ध समजावे, ते शुद्ध आहे.” 59 लोकरीच्या किंवा सणाच्या वस्त्रावर, त्याच्या ताण्यावर किंवा बाण्यावर अथवा चामड्याच्या कोणत्याही वस्तूवर महारोगाचा चट्टा दिसून आला तर ती शुद्ध किंवा अशुद्ध ठरविण्याचे हे नियम आहेत.

הפוך קריאה ללימוד ממשי

הירשמו כדי לשמור פסוקים, לרשום הערות וללמוד עם כלי AI.

בחר את הצעד הבא אחרי הפרק הזה המשך לקרוא, בחר תכנית או המשך ללמוד עם AI.
עקוב אחר הנושאים שהפרק הזה פותח מרכזי נושאים קשורים לשאלות הגדולות שהפרק הזה יכול לפתוח.