Mark 5

Comenzar este capítulo con AI

Pregunta a la IA sobre este capítulo

Mantente en el texto y pregunta sobre el movimiento, tensión, trasfondo y lo que este capítulo revela dentro del libro más amplio.

1 मग येशू आणि त्याचे शिष्य सरोवराच्या पलीकडे, गरसेकरांच्या प्रदेशात आले. 2 तो तारवातून उतरताच अशुद्ध आत्मा लागलेला एक मनुष्य कबरांतून निघून त्यास भेटला. 3 तो कबरांमध्ये राहत असे व त्यास साखळदंडाने आणखी बांधून ठेवणे आता कोणाला शक्य नव्हते. 4 कारण त्यास पुष्कळ वेळा बेड्यांनी व साखळदंडांनी बांधले असताही, त्याने साखळदंड तोडून टाकले होते व बेड्यांचे तुकडे तुकडे केले होते आणि त्यास ताब्यात ठेवण्याचे सामर्थ्य कोणालाही नव्हते. 5 तो नेहमी रात्रंदिवस कबरांमध्ये व डोंगरांमध्ये राहून ओरडत असे व टोकदार दगडांनी आपले अंग ठेचून घेत असे. 6 येशूला दुरून पाहताच, तो धावत आला व त्याच्या पाया पडला. 7 आणि मोठ्याने ओरडून म्हणाला, “हे येशू, परात्पर देवाच्या पुत्रा, तू मध्ये का पडतोस? मी तुला देवाची शपथ घालतो, मला छळू नकोस.” 8 कारण येशू त्यास म्हणत होता, “अरे अशुद्ध आत्म्या, या मनुष्यातून निघ.” 9 त्याने त्यास विचारले, “तुझे नाव काय?” त्याने उत्तर दिले, “माझे नाव सैन्य, कारण आम्ही पुष्कळ आहोत. 10 आणि आम्हास या देशातून घालवू नकोस” अशी तो त्यास आग्रहाने विनंती करत होता. 11 तेथे डोंगराच्या कडेला डुकरांचा एक मोठा कळप चरत होता. 12 तेव्हा अशुद्ध आत्म्यांनी त्यास विनंती केली की, “आम्ही त्या डुकरांत शिरावे, म्हणून त्यांच्याकडे आम्हास लावून दे.” 13 मग त्याने त्यास परवानगी दिली. तेव्हा ते अशुद्ध आत्मे निघून डुकारात शिरले आणि तो सुमारे दोन हजार डुकरांचा कळप तडक धावत जाऊन कड्यावरून सरोवरात पडला व पाण्यात गुदमरून मरण पावला. 14 डुकरे राखणारे पळाले व त्यांनी गावात व शेतमळ्यांत हे वर्तमान सांगितले, तेव्हा काय झाले हे पाहण्यास लोक आले. 15 ते येशूजवळ आल्यावर तो भूतग्रस्त, म्हणजे ज्यात सैन्य होते तो, कपडे घातलेला आणि शुद्धीवर आलेला त्यांच्या दृष्टीस पडला आणि त्यांना भीती वाटली. 16 ज्यांनी ते पाहिले होते त्यांनी भूतग्रस्ताला काय झाले ते व डुकरांविषयीची हकीकत इतरांना सांगितली. 17 तेव्हा आपण आमच्या प्रांतातून निघून जावे असे ते त्यास विनवू लागले. 18 मग तो तारवात जात असता, पूर्वी भूतग्रस्त असलेला मनुष्य त्यास विनंती करू लागला की, मलाही तुमच्या सोबत घ्या. 19 परंतु त्याने त्यास आपल्या सोबत येऊ दिले नाही, तर त्यास म्हटले, “तू आपल्या घरी स्वकीयांकडे जा आणि प्रभूने तुझ्यासाठी केवढी मोठी कामे केली व तुझ्यावर कशी दया केली हे त्यांना सांग.” 20 तेव्हा तो निघाला आणि येशूने जी मोठी कामे त्याच्यासाठी केली होती ती दकापलीस येथे जाहीर करू लागला. तेव्हा सर्वांस आश्चर्य वाटले. 21 मग येशू तारवात बसून पलीकडे परत गेल्यावर त्याच्याजवळ लोकांचा मोठा समुदाय जमला आणि तो सरोवराजवळ होता. 22 तेव्हा याईर नावाचा सभास्थानाचा एक अधिकारी येथे आला व त्यास पाहून त्याच्या पाया पडला. 23 त्याने आग्रहाने त्यास विनवणी केली की, “माझी लहान मुलगी मरायला टेकली आहे. तिने बरे होऊन जगावे म्हणून आपण येऊन तिच्यावर हात ठेवा.” 24 मग तो त्याच्याबरोबर निघाला तेव्हा पुष्कळ लोक त्याच्यामागून चालत होते आणि त्याच्याभोवती गर्दी करीत होते. 25 आणि तेथे रक्तस्रावाने बारा वर्षे पीडलेली एक स्त्री होती. 26 तिने बऱ्याच वैद्यांच्या हातून पुष्कळ हाल सोसून आपल्याजवळ जे काही होते ते सर्व खर्च केले होते तरी तिला काही गुण न येता तिचे दुखणे अधिकच झाले होते. 27 येशूविषयीच्या गोष्टी ऐकून ती त्या गर्दीत शिरली आणि त्याच्यामागे येऊन त्याच्या वस्त्राला स्पर्श केला. 28 कारण ती म्हणत होती, “केवळ याच्या वस्त्रांना स्पर्श जरी केला तरी मी बरी होईन.” 29 तेव्हा लगेचच तिचा रक्तस्राव थांबला आणि आपण त्या पीडेपासून बरे झालो आहोत असा तिला शरीरात अनुभव आला. 30 आपणामधून शक्ती निघाली आहे हे येशूने आपल्याठायी लगेच ओळखले आणि गर्दीमध्ये वाळून म्हटले, “माझ्या वस्त्रांना कोणी स्पर्श केला?” 31 त्याचे शिष्य त्यास म्हणाले, “लोकसमुदाय आपणाभोवती गर्दी करत आहे हे आपण पाहत आहा, तरी आपण म्हणता, मला कोणी स्पर्श केला?” 32 मग जिने हे केले होते तिला पाहण्यास त्याने सगळीकडे बघितले. 33 तेव्हा ती स्त्री आपल्या बाबतीत जे काही घडले, ते जाणून भीत भीत व कापत कापत त्याच्याकडे आली व त्याच्या पाया पडून तिने त्यास सर्वकाही सत्य सांगितले. 34 तो तिला म्हणाला, “मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. शांतीने जा आणि तुझ्या पीडेपासून मुक्त हो.” 35 येशू हे बोलत आहे इतक्यात सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या घराकडून काही माणसे येऊन त्यास म्हणाली, “आपली मुलगी मरण पावली, आता गुरुजींना त्रास कशाला देता?” 36 परंतु येशू त्यांच्या बोलण्याकडे लक्ष्य न देता, सभास्थानाच्या अधिकाऱ्याला म्हणाला, “भिऊ नकोस. विश्वास मात्र धर.” 37 त्याने पेत्र, याकोब व याकोबाचा भाऊ योहान, यांच्याशिवाय कोणालाही आपल्याबरोबर येऊ दिले नाही. 38 मग ते सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या घराजवळ आले, तेव्हा रडत असलेल्या व फारच आकांत करीत असलेल्या लोकांची गडबड त्याने पाहिली. 39 तो आत जाऊन त्यास म्हणाला, “तुम्ही कशाला रडता व गडबड करता? मूल मरण पावले नाही, झोपी गेले आहे.” 40 तेव्हा ते त्यास हसू लागले. पण त्याने त्या सर्वांना बाहेर काढून दिले आणि मुलीचे आई-वडील व आपल्याबरोबरचे शिष्य यांना घेऊन मुलगी होती तेथे तो आत गेला. 41 नंतर मुलीच्या हातास धरून तो म्हणाला, “तलीथा कूम,” याचा अर्थ, “मुली, मी तुला सांगतो, ऊठ.” 42 आणि लगेच ती मुलगी उठून चालू लागली; (ती बारा वर्षाची होती.) ते अत्यंत आश्चर्यचकित झाले. 43 हे कोणाला कळता कामा नये, अशी त्याने त्यांना निक्षून आज्ञा केली आणि तिला खाण्यास द्या असे सांगितले.

Convierte la lectura en estudio real

Regístrate para guardar versículos, tomar notas y estudiar con herramientas de IA.

Elige tu próximo paso después de este capítulo Sigue leyendo, elige un plan o continúa estudiando con AI.
Sigue los temas que este capítulo abre Centros de temas relacionados para las preguntas más amplias que este capítulo puede haber abierto.