2 Kings 5

Comenzar este capítulo con AI

Pregunta a la IA sobre este capítulo

Mantente en el texto y pregunta sobre el movimiento, tensión, trasfondo y lo que este capítulo revela dentro del libro más amplio.

1 नामान हा अरामाच्या राजाचा सेनापती होता. तो राजासाठी फार महत्वाचा मनुष्य होता कारण त्याच्या मार्फतच परमेश्वर अरामाच्या राजाला विजय मिळवून देत असे. नामान चांगला शूर वीर होता खरा, पण त्यास कोड होते. 2 अरामी सैन्याच्या बऱ्याच फौजा इस्राएलामध्ये लढाईवर गेल्या होत्या, तेथून त्या सैनिकांनी बरेच लोक गुलाम म्हणून धरुन आणले होते. एकदा त्यांनी इस्राएलामधून एक लहान मुलगीही आणली. ती पुढे नामानाच्या पत्नीची दासी झाली. 3 ती आपल्या धनीणीला म्हणाली, “आपल्या मालकांनी शोमरोनातील संदेष्ट्याला भेटावे. तो त्यांचे कोड बरे करेल.” 4 कोणी तरी आपल्या धन्याला सांगितले की ती इस्राएली मुलगी असे म्हणत आहे. 5 त्यावर अरामाचा राजा म्हणाला, “आत्ताच जा. इस्राएलाच्या राजासाठी मी पत्र देतो.” तेव्हा नामान इस्राएलाला निघाला. आपल्याबरोबर त्याने दहा किक्कार चांदी, सोन्याची सहा हजार नाणी आणि दहा पोशाखाचे जोड घेतले. 6 आपल्या राजाकडून त्याने इस्राएलाच्या राजासाठी पत्रही घेतले. त्यामध्ये लिहिले होते. की माझ्या सेवेतील नामान याला तुमच्याकडे पाठवत आहे. त्याचे कोड बरे करावे. 7 इस्राएलाच्या राजाने हे पत्र वाचले तेव्हा त्याने आपले कपडे फाडले. तो म्हणाला, “मी देव आहे काय, जीवन आणि मृत्यू यावर माझी सत्ता नाही. त्याने कोड असलेल्या मनुष्यास उपचारासाठी माझ्याकडे का बरे पाठवावे? हा माझ्याशी भांडण करण्याचे कारण काढत आहे.” 8 राजाने कपडे फाडले हे देवाचा मनुष्य अलीशा याने ऐकले. त्याने मग राजाला निरोप पाठवला, “तू आपले कपडे का फाडलेस? त्यास माझ्याकडे येऊ दे म्हणजे इस्राएलामध्ये संदेष्टा असल्याचे त्यास कळेल.” 9 तेव्हा नामान आपले रथ, घोडे यांसह अलीशाच्या घराच्या दाराबाहेर जाऊन उभा राहिला. 10 अलीशाने निरोप पाठवला, “तू जाऊन यार्देनेत सात वेळा स्नान कर म्हणजे तुझे शरीर पूर्वीसारखे होऊन तू शुध्द होशील.” 11 नामान हे ऐकून खूप रागावला आणि निघून गेला. तो म्हणाला, “पहा, मला वाटले, तो बाहेर येईल, उभा राहून आपला देव परमेश्वर याचे नाव घेऊन आपला हात माझ्या अंगावरुन फिरवून माझे कोड बरे करील. 12 अबाना आणि परपर या दिमिष्कातील नद्या इस्राएलामधील नद्यापेंक्षा निश्चितच चांगल्या आहेत. मग त्यामध्येच स्नान करून मी शुध्द होणार नाही काय?” एवढे बोलून संतापाने नामान तोंड फिरवून निघून गेला. 13 मग नामानाचे सेवक त्याच्याकडे येऊन त्यास म्हणाले, “माझ्या पित्या, संदेष्ट्याने तुम्हास एखादी अवघड गोष्ट करायला सांगितली असती तर तुम्ही ती केली असती, नाही का? ‘स्नान करून शुध्द हो,’ एवढेच त्याने आपल्याला सांगितले. ते आपण का करू नये?” 14 तेव्हा त्याने देवाचा मनुष्याच्या सूचनेप्रमाणे यार्देन नदीत सात वेळा बुडी मारली. तेव्हा त्याचे शरीर लहान मुलाच्या शरीरासारखे होऊन तो शुध्द झाला. 15 नामान व त्याच्याबरोबरचे लोक देवाच्या मनुष्याकडे परत जाऊन त्याच्यासमोर उभे राहिले. तो म्हणाला, “पहा, सर्व पृथ्वीवर इस्राएलाबाहेर देव नाही हे आता मला कळाले आहे. माझ्याकडून कृपया, ही भेट घ्यावी.” 16 पण अलीशाने त्यांना उत्तर दिले, “ज्याच्यापुढे मी उभा राहतो त्या परमेश्वराच्या जीविताची शपथ घेऊन सांगतो, मी काहीही घेणार नाही.” त्याने अलीशाला पुष्कळ आग्रह केला, पण त्याने नकार दिला. 17 तेव्हा नामान म्हणाला, माझ्यासाठी एवढे करावे. माझ्या दोन खेचरावर लादून नेता येईल इतकी माती नेण्याची मला मुभा द्यावी. म्हणजे मी यापुढे परमेश्वराशिवाय दुसऱ्या कोणत्याही दैवतांना होमबली किंवा यज्ञ अर्पण करणार नाही. 18 परमेश्वराने मला एकागोष्टींची क्षमा करावी. अरामाचा राजा माझा स्वामी, रिम्मोनच्या दैवतांच्या पूजेला जातो तेव्हा मी त्यास नमन करीन तेव्हा परमेश्वराने आपल्या दासास क्षमा करावी. 19 तेव्हा अलीशा त्यास म्हणाला, शांतीने जा. मग नामान निघून गेला. 20 तो थोडी वाट चालून गेल्यावर अलीशा याचा नोकर गेहजी याने विचार केला, “पाहा, माझ्या धन्याने या अरामी नामानाकडून भेट न स्विकारता त्यावर दया केली. परमेश्वराच्या जीविताची शपथ मीच त्यामागे धावत जाऊन त्याजपासून काहीतरी घेतो.” 21 मग गेहजी नामानाच्या मागे निघाला. जेव्हा नामानाने आपल्या मागून कोणाला तरी पळत येताना पाहिले, तेव्हा त्यास भेटायला तो रथातून खाली उतरला व म्हणाला, “सगळे ठीक आहे ना?” 22 गेहजी म्हणाला, “हो, सगळे ठीक आहे. माझ्या धन्याने मला पाठवले आहे. त्यांनी सांगितले आहे, ‘एफ्राईमाच्या डोंगराळ प्रदेशातून संदेष्ट्यांचे दोन शिष्य माझ्याकडे आले आहेत. त्यांच्यासाठी एक किक्कार चांदी आणि दोन पोशाख द्या.” 23 नामानाने उत्तर दिले, “मला तुला दोन किक्कार देण्यास आनंद होत आहे.” नामानाने गेहजीला आग्रह करून दोन किक्कार चांदीच्या दोन थैल्या बांधून दोन पोषाखासह आपल्या दोन सेवकांच्या खांद्यावर दिल्या. 24 डोंगराशी आल्यावर गेहजीने नोकरांकडून ते सर्व घेतले आणि त्यांना परत पाठवले. नोकर माघारी आले. मग गेहजीने हा ऐवज आपल्या घरात लपवला. 25 गेहजी आला आणि आपले स्वामी अलीशा यांच्यासमोर उभा राहिला अलीशाने गेहजीला विचारले, “तू कोठे गेला होतास?” गेहजी म्हणाला, “मी कोठेच गेलो नव्हतो.” 26 अलीशा त्यास म्हणाला, “नामान तुला भेटायला आपल्या रथातून उतरला तेव्हा माझे लक्ष तुझ्याकडेच होते. चांदी, कपडे, जैतूनाचे बाग, द्राक्षाचे मळे, शेरडेमेंढरे, गुरेढोरे, दासदासी घेण्याची ही वेळ आहे काय?” 27 नामानचा कोड तुला आणि तुझ्या मुलांना सर्वकाळ लागून राहिल. अलीशाकडून गेहजी निघाला तेव्हा त्याची त्वचा बर्फासारखी पांढरी शुभ्र झाली होती. गेहजीला कोड उठले होते.

Convierte la lectura en estudio real

Regístrate para guardar versículos, tomar notas y estudiar con herramientas de IA.

Elige tu próximo paso después de este capítulo Sigue leyendo, elige un plan o continúa estudiando con AI.
Sigue los temas que este capítulo abre Centros de temas relacionados para las preguntas más amplias que este capítulo puede haber abierto.