Revelation 7

Start this chapter with AI

Ask AI

Stay in the text and ask about the movement, tension, background, and what this chapter reveals inside the larger book.

1 आणि त्यानंतर मी चार देवदूत पृथ्वीच्या चार कोनावर उभे राहीलेले पाहीले, त्यांनी पृथ्वीतील चार वाऱ्यास असे घट्ट धरून ठेवले होते की पृथ्वीवर व समुद्रावर आणि कोणत्याही झाडावर वारा वाहू नये. 2 मी दुसरा एक देवदूत पूर्वेकडून वर चढताना पाहिला, त्याच्याजवळ जिवंत देवाचा शिक्का होता; ज्या चार देवदूतांकडे पृथ्वीला व समुद्राला नुकसान करण्याचे सोपवून दिले होते त्यांना तो मोठ्याने ओरडून म्हणाला, 3 “आमच्या देवाचे दास यांच्या कपाळावर आम्ही शिक्का मारीपर्यंत पृथ्वीला व समुद्राला आणि झाडासही नुकसान करू नका.” 4 ज्यांच्यावर शिक्का मारण्यात आला त्यांची संख्या मी ऐकली; इस्राएल लोकांच्या सर्व वंशातील एकशे चव्वेचाळीस हजांरावर शिक्का मारण्यात आला. 5 यहूदा वंशातील बारा हजारांवर शिक्का मारण्यात आला रऊबेन वंशापैकी बारा हजारांवर; गाद वंशापैकी बारा हजारांवर; 6 आशेर वंशापैकी बारा हजारांवर; नफताली वंशापैकी बारा हजारांवर; मनश्शे वंशापैकी बारा हजारांवर; 7 शिमोन वंशापैकी बारा हजारांवर; लेवी वंशापैकी बारा हजारांवर; इस्साखार वंशापैकी बारा हजारांवर; 8 जबुलून वंशापैकी बारा हजारांवर; योसेफ वंशापैकी बारा हजारांवर; बन्यामीन वंशापैकी बारा हजारांवर; शिक्का मारण्यात आला. 9 या यानंतर मी पाहिले, तो प्रत्येक राष्ट्र, वंश, लोक व भाषा यांच्यातील कोणाच्याने मोजला जाऊ शकणार नाही एवढा मोठा समुदाय, तो राजासनापुढे व कोकऱ्याच्यापुढे उभा होता. शुभ्र झगे घातलेले आणि त्यांच्या हातात झावळ्या होत्या. 10 ते मोठ्याने ओरडून म्हणत होतेः राजासनावर बसलेल्या आमच्या देवाकडून व कोकऱ्याकडून, तारण आहे. 11 तेव्हा राजासन व वडील आणि चार जिवंत प्राणी यांच्यासभोवती सर्व देवदूत उभे होते आणि ते राजासनासमोर पालथे पडून देवाला नमन करीत 12 म्हणाले, आमेन; स्तुती, गौरव, ज्ञान, उपकारस्तुती, सन्मान, सामर्थ्य व बळ ही युगानुयुग आमच्या देवाची आहेत; आमेन. 13 तेव्हा वडिलातील एकाने मला विचारले हे “शुभ्र झगे घातलेले हे कोण आहेत आणि ते कोठून आले आहेत?” 14 मी त्यास म्हटले, “प्रभू, तुला माहित आहे.” आणि तो मला म्हणाला जे मोठ्या संकटातून येतात ते हे आहेत; त्यांनी आपले झगे कोकऱ्याच्या समर्पणाच्या रक्तात धुऊन शुभ्र केले आहेत. 15 म्हणून ते देवाच्या राजासनासमोर आहेत आणि ते रात्रंदिवस त्याच्या भवनात सेवा करतात. जो राजासनावर बसलेला आहे तो आपला मंडप त्यांच्यावर घालील. 16 ते आणखी भुकेले आणि आणखी तान्हेले होणार नाहीत, त्यास सूर्य किंवा कोणतीही उष्णता बाधणार नाही. 17 कारण राजासनाच्या मध्यभागी असलेला कोकरा स्वतः त्यांचा मेंढपाळ होईल, आणि तो त्यांना जीवनाच्या पाण्याच्या झऱ्यांजवळ नेईल; आणि देव स्वतः त्यांच्या डोळ्यातील सर्व अश्रू पुसून टाकील.

Turn reading into real study

Sign up to bookmark verses, take notes, and study with AI-powered tools.

Choose your next step after this chapter Keep reading, choose a plan, or keep studying with AI.
Follow the themes this chapter opens Related topic hubs for the larger questions this chapter may have opened.