Psalms 71

Start this chapter with AI

Ask AI

Stay in the text and ask about the movement, tension, background, and what this chapter reveals inside the larger book.

1 हे परमेश्वरा, मी तुझ्यात आश्रय घेतला आहे; मला कधीही लज्जित होऊ देऊ नको. 2 मला सोडव आणि तुझ्या न्यायीपणात मला सुरक्षित ठेव; तू आपला कान मजकडे लाव आणि माझे तारण कर. 3 मला नेहमी आश्रय मिळावा म्हणून माझा तू खडक हो; तू मला तारावयास आज्ञा दिली आहे, कारण तू माझा खडक आणि दुर्ग आहेस. 4 हे माझ्या देवा, तू मला दुष्टांच्या हातातून वाचव, अन्यायी आणि निष्ठूर मनुष्याच्या हातातून मला वाचव. 5 कारण हे प्रभू, तू माझी आशा आहेस. मी लहान मूल होतो तेव्हापासूनच तू माझा भरवसा आहे. 6 गर्भापासून तूच माझा आधार आहेस; माझ्या आईच्या उदरातून तूच मला बाहेर काढले; माझी स्तुती नेहमी तुझ्याविषयी असेल. 7 पुष्कळ लोकांस मी कित्ता झालो आहे; तू माझा बळकट आश्रय आहे. 8 माझे मुख दिवसभर तुझ्या स्तुतीने आणि सन्मानाने भरलेले असो. 9 माझ्या वृद्धापकाळात मला दूर फेकून देऊ नको; जेव्हा माझी शक्ती कमी होईल तेव्हा मला सोडू नकोस. 10 कारण माझे शत्रू माझ्याविरूद्ध बोलत आहेत; जे माझ्या जिवावर पाळत ठेवून आहेत ते एकत्रित येऊन कट करत आहेत. 11 ते म्हणाले देवाने त्यास सोडले आहे; त्याचा पाठलाग करा आणि त्यास घ्या, कारण त्यास सोडवणारा कोणीही नाही. 12 हे देवा, तू माझ्यापासून दूर जाऊ नकोस; माझ्या देवा, माझ्या मदतीला त्वरा कर! 13 जे माझ्या जिवाचे विरोधी आहेत त्यांना लज्जित आणि नष्ट कर, जे माझे अनिष्ट करण्याचा प्रयत्न करतात त्यांना धिक्काराने आणि मानहानीने झाकून टाक. 14 पण मी तुझ्यात नेहमीच आशा धरून राहीन, आणि तुझी जास्तीत जास्त स्तुती करीत जाईन. 15 माझे मुख तुझ्या न्यायीपणाचे आणि तारणाविषयी सांगत राहील, जरी मला ते समजले नाही. 16 प्रभू परमेश्वराच्या सामर्थ्यी कृत्याबरोबर मी त्यांच्याकडे जाईन; मी तुझ्या, केवळ तुझ्याच, नितिमत्वाचा उल्लेख करीन. 17 हे देवा, तू माझ्या तरुणपणापासून मला शिकवीत आला आहेस; आतासुद्धा तुझी आश्चर्यजनक कृत्ये सांगत आहे. 18 खरोखर, जेव्हा आता मी म्हातारा आणि केस पिकलेला झालो आहे, तेव्हा पुढल्या पिढीला तुझे सामर्थ्य, येणाऱ्या प्रत्येकाला तुझा पराक्रम मी सांगेपर्यंत, हे देवा, मला सोडू नको. 19 हे देवा, तुझे नितिमत्व खूप उंच आहे; हे देवा, ज्या तू महान गोष्टी केल्या आहेस, त्या तुझ्यासारखा कोण आहे? 20 ज्या तू मला अनेक भयंकर संकटे दाखवली, तो तू मला पुन्हा जिवंत करशील; आणि मला पृथ्वीच्या अधोभागातून पुन्हा वर आणशील. 21 तू माझा सन्मान वाढव; आणि पुन्हा वळून माझे सांत्वन कर. 22 मी सतारीवरही तुला धन्यवाद देईन, हे माझ्या देवा, मी तुझ्या सत्याचे स्तवन करीन; हे इस्राएलाच्या पवित्र प्रभू, मी वीणेवर तुझी स्रोत्रे गाईन. 23 मी तुझी स्तवने गाताना माझे ओठ हर्षाने आणि जो माझा जीव तू खंडून घेतला तोही जल्लोष करील. 24 माझी जीभदेखील दिवसभर तुझ्या नितिमत्वाविषयी बोलेल; कारण ज्यांनी मला इजा करण्याचा प्रयत्न केला ते लज्जित झाले आहेत, आणि गोंधळून गेले आहेत.

Turn reading into real study

Sign up to bookmark verses, take notes, and study with AI-powered tools.

Choose your next step after this chapter Keep reading, choose a plan, or keep studying with AI.
Follow the themes this chapter opens Related topic hubs for the larger questions this chapter may have opened.