2 Samuel 22

Start this chapter with AI

Ask AI

Stay in the text and ask about the movement, tension, background, and what this chapter reveals inside the larger book.

1 शौल आणि इतर शत्रू यांच्या हातून परमेश्वराने सोडवल्याबद्दल दावीदाने हे स्तुतिगीत म्हटले; 2 परमेश्वर हा माझा दुर्ग, माझा गड, माझ्या सुरक्षिततेचा आधार. 3 “तो माझा देव माझ्या संरक्षणासाठी मी या दुर्गाच्या, देवाच्या आश्रयाला जातो. देव म्हणजे माझी संरक्षक ढाल आहे त्याचे सामर्थ्य माझे रक्षण करते. परमेश्वर म्हणजे माझी लपण्याची जागा, माझ्या सुरक्षिततेचे ठिकाण उंच डोंगरात असलेले. क्रूर शत्रूपासून तो मला वाचवतो. 4 त्यांनी माझी चेष्टा केली, पण मी मदतीसाठी परमेश्वराचा धावा केला, आणि शत्रूपासून माझा बचाव करण्यात आला. 5 शत्रूंना माझा जीव घ्यायचा होता. मृत्यूच्या लाटा माझ्याभोवती थैमान घालत होत्या. मृत्युसदनाला नेणाऱ्या पुराच्या लोंढ्यात मी सापडलो होतो. 6 अधोलोकाचे पाश माझ्या भोवती आवळले होते. मृत्यूचा सापळा माझ्यासमोर तयार होता. 7 तेव्हा मी परमेश्वराचा धावा केला. होय, मी त्यालाच शरण गेलो देव त्याच्या मंदिरात होता त्याने माझा धावा ऐकला. मदतीसाठी केलेला माझा आक्रोश त्याने ऐकला. 8 तेव्हा धरती डळमळली हादरली स्वर्गाचा पाया थरथरला, कारण देवाचा कोप झाला होता. 9 त्याच्या नाकपुड्यांतून धूर निघत होता. मुखातून अग्नीज्वाला बाहेर पडत होत्या ठिणग्या बरसत होत्या. 10 आकाश फाडून परमेश्वर खाली अवतरला. काळ्याभोर ढगावर उभा राहिला. 11 करुबावर आरुढ होऊन तो उडत होता. तो वाऱ्यावर स्वार झाला होता. 12 परमेश्वराने दाट काळे ढग स्वत:भोवती तंबू सारखे वेढून घेतले होते. त्याने त्या दाट गडगडणाऱ्या मेघामध्ये पाणी भरून ठेवले होते. 13 त्याचा एवढा प्रखर प्रकाश पडला की, निखारे धगधगू लागले. 14 परमेश्वर आकाशातून गरजला. त्याचा आवाज सर्वत्र दुमदुमला. 15 त्याने विजांचे बाण सोडले आणि शत्रूची दाणादाण उडाली. परमेश्वराने विजा पाठवल्या आणि लोक भीतीने सैरावैरा पळाले. 16 परमेश्वरा, तुझ्या धमकीच्या आवाजात तू बोललास तेव्हा तुझ्या नाकपुड्यातील सोसाट्याच्या श्वासाने समुद्राचे पाणीही मागे हटले. समुद्राचा तळ दिसू लागला, पृथ्वीचा पाया उघडा पडला. 17 मला परमेश्वराने आधार दिला, वरून तो खाली आला. मला धरून त्याने संकटाच्या खोल पाण्यातून बाहेर काढले. 18 शत्रू मला वरचढ होता. त्यांना माझा मत्सर वाटला. शत्रू बलाढ्य होता. पण परमेश्वराने मला वाचवले. 19 मी अडचणीत होतो तेव्हा शत्रूने माझ्यावर हल्ला केला. पण परमेश्वराने मला आधार दिला. 20 परमेश्वराचा माझ्यावर लोभ आहे, म्हणून त्याने मला सोडवले. मला त्याने सुरक्षित स्थळी नेले. 21 मी केले त्याचे फळ परमेश्वर मला देईल, कारण मी योग्य तेच केले. मी गैर काही केले नाही, तेव्हा त्याचे चांगले फळ तो मला देईल. 22 कारण मी परमेश्वराचे आज्ञापालन केले. देवाविरुध्द कोणताही अपराध मी केला नाही. 23 परमेश्वराचे निर्णय मी नेहमी ध्यानात ठेवतो. त्याच्या नियमांचे पालन करतो. 24 मी त्याच्याशी निर्दोषतेने वागत असे, आणि मी अधर्मापासून स्वत:ला अलिप्त राखले. 25 तेव्हा परमेश्वर त्याचे फळ मला देणारच. कारण माझी वर्तणूक योग्य आहे. त्याच्या दृष्टीने मी वावगे केलेले नाही. तेव्हा तो माझे भले करील. 26 एखाद्याचे आपल्यावर खरे प्रेम असेल तर आपणही त्याची भरपाई खऱ्या प्रेमाने करू. तो आपल्याशी प्रामाणिक असेल तर आपणही प्रामाणिक राहू. 27 हे परमेश्वरा, जे लोक चांगले आणि शुध्द आचरणाचे आहेत त्यांच्याशी तूही तसाच वागतोस. पण दुष्ट आणि कुटिलांशी तू ही कुटिलतेने वागतोस. 28 परमेश्वरा, दीनांना तू मदत करतोस, गर्विष्ठांना धडा शिकवतोस. 29 परमेश्वरा, तू माझा दीप आहेस. माझ्या भोवतीचा अंधकार तू उजळवून टाकतोस. 30 परमेश्वरा, तुझ्या मदतीनेच मी सैन्यावर चाल करू शकतो. देवाच्या मदतीनेच मी शत्रूंची भिंतसुध्दा पार करू शकतो. 31 देवाची सत्ता सर्वकष आहे. परमेश्वराचे वचन कसोटीला उतरलेले आहे. त्याच्यावर भरवसा टाकणाऱ्या, सर्वांची तो ढाल आहे. 32 या परमेश्वरा खेरीज दुसरा देव कोणता? याच्याखेरीज भक्कम दुर्ग कोण? 33 देव माझा मजबूत दुर्ग आहे. सात्विक लोकांस तो आपल्या मार्गाने नेतो. 34 देव मला हरणासारखे वेगाने पळण्यास मदत करतो. तो मला आत्मविश्वास देतो. उच्च स्थानावर तो मला अढळ ठेवतो. 35 युध्दकलेत तो मला तरबेज बनवतो. त्यामुळे माझे बाहू भक्कम धनुष्याने शिरसंधान करू शकतात. 36 देवा, तूच मला वाचवलेस आणि जिंकायला मदत केलीस. शत्रूचा पाडाव करण्यात मला हात दिलास. 37 माझ्या पायांत बळ दे, म्हणजे मी न अडखळता ताठ चालू शकेन. 38 शत्रूंचा नि:पात होईपर्यंत मला त्यांचा पाठलाग करायचा आहे. त्यांचा उच्छेद होई पर्यंत मी परतणार नाही. 39 त्यांचा मी नाश केला. त्यांचा पराभव केला. आता ते शत्रू डोके वर काढू शकणार नाहीत. होय, ते माझ्या पायदळी तुडवले गेले. 40 देवा, युध्दात तू मला वरचढ केलेस. शत्रूचा पाडाव केलास. 41 त्यांना मला पाठ दाखवायला लावलेस, म्हणून मी त्यांच्यावर वार करू शकलो. 42 शत्रू मदतीसाठी याचना करू लागले. पण कोणीही त्यांच्या मदतीला आले नाही. त्यांनी परमेश्वराचा धावाही केला त्यानेही त्यांच्याकडे पाठ फिरवली. 43 माझ्या शत्रूची मी खांडोळी केली. जमिनीवरच्या धुळीसारखा त्यांचा मी भुगा केला. चिखल तुडवावा तसे मी त्यांना तुडवले. 44 माझ्यावर जे चाल करून आले त्यांच्यापासून तू मला संरक्षण दिलेस. त्यांच्यावर राज्यकर्ता म्हणून मला नेमलेस. ज्यांना मी कधी बघितले नव्हते ती राष्ट्रे माझे दास झाली. 45 आता दूर देशचे लोक माझे ऐकतात जेव्हा ते माझी आज्ञा ऐकतात, तात्काळ माझा शब्द मानतात. माझा त्यांना धाक वाटतो. 46 भीतीने ते गर्भगळीत होतात. हे परदेशी लोक जिथे लपून बसले होते, ती जागा सोडून भीतीने थरथर कापत बाहेर येतात. 47 परमेश्वर जिवंत आहे. माझ्या दुर्गाची मी स्तुती करतो देव महान आहे. तो माझा रक्षणकर्ता दुर्ग आहे. 48 या देवानेच माझ्या शत्रूंना धडा शिकवला. लोकांस माझ्या शासनामध्ये ठेवले. 49 देवा, तू माझे वैऱ्यांपासून रक्षण केलेस. मला विरोध करणाऱ्यांचा पाडाव करण्याचे सामर्थ्य मला दिलेस. दुष्टांपासून मला वाचवलेस. 50 हे परमेश्वरा, म्हणून मी राष्ट्राराष्ट्रांमध्ये आभारपूर्वक तुझी स्तुतिस्तोत्रे गाईन. तुझे नामसंकीर्तन करीन. 51 परमेश्वर राजाला युध्दात विजयी करतो. आपल्या अभिषिक्त राजाबद्दल परमेश्वर खरे प्रेम दाखवतो. दावीद आणि त्याचे वंशज यांचे तो निरंतर कल्याण करील.”

Turn reading into real study

Sign up to bookmark verses, take notes, and study with AI-powered tools.

Choose your next step after this chapter Keep reading, choose a plan, or keep studying with AI.
Follow the themes this chapter opens Related topic hubs for the larger questions this chapter may have opened.