1 Kings 22

Start this chapter with AI

Ask AI

Stay in the text and ask about the movement, tension, background, and what this chapter reveals inside the larger book.

1 पुढील तीन वर्षे इस्राएल आणि अराम यांच्यामध्ये शांततेची गेली. 2 तिसऱ्या वर्षी, यहूदाचा राजा यहोशाफाट इस्राएलाचा राजा याला भेटायला गेला. 3 यावेळी इस्राएलाच्या राजाने आपल्या अधिकाऱ्यांना विचारले, “अरामाच्या राजाने रामोथ-गिलाद आपल्याकडून घेतले होते ते आठवते ना? ते परत मिळवण्यासाठी आपण काहीच का केले नाही? रामोथ आपले असायला हवे.” 4 आणि इस्राएल राजा यहोशाफाटाला म्हणाला, “तुम्ही आमच्या बाजूने रामोथ-गिलाद येथे अरामी सैन्याशी लढाल का?” यहोशाफाट म्हणाला, “अवश्य माझे सैन्य आणि घोडे तुमचेच आहेत.” 5 यहोशाफाटाने इस्राएलाच्या राजास म्हटले, “प्रथम आपण परमेश्वराचा सल्ला घेतला पाहिजे.” 6 तेव्हा इस्राएलाच्या राजाने संदेष्ट्यांची एक सभा घेतली. तेव्हा तिथे चारशे संदेष्टे हजर होते. राजाने त्यांना विचारले, “आपण आत्ताच रामोथ-गिलाद येथे अरामी फौजेवर चालून जावे का?” की काही काळ थांबावे? संदेष्टे म्हणाले, “तुम्ही खुशाल आत्ताच हल्ला करा. परमेश्वर तुम्हास जय मिळवून देईल.” 7 पण यहोशाफाटाने शंका काढली, “परमेश्वराचा आणखी कोणी संदेष्टा यांच्या खेरीज इथे आहे का? तसा असेल तर त्यालाही देवाचे मत विचारलेले बरे.” 8 इस्राएलाचा राजा म्हणाला, “ज्याच्या द्वारे परमेश्वराचा सल्ला घेता येईल तसा आणखी एक संदेष्टा आहे. इम्ला याचा पुत्र मीखाया.” पण मी त्याचा द्वेष करतो. कारण तो काही सांगतो तेव्हा माझ्याबद्दल कधीच चांगले भविष्यकथन करत नाही. त्याचे बोलणे मला अप्रिय वाटते. यहोशाफाट म्हणाला, “इस्राएलाच्या राजा, तुझे असे बोलणे बरोबर नव्हे.” 9 तेव्हा इस्राएलाच्या राजाने आपल्या एका सेवकाला “इम्लाचा पुत्र मीखायाला घेऊन येण्यास सांगितले.” 10 यावेळी इस्राएलाचा राजा व यहूदाचा राजा यहोशाफाट राजवस्त्रे घालून सिंहासनावर बसले होते. शोमरोनच्या वेशीजवळ न्यायदान चालते त्याठिकाणी ते होते. सर्व संदेष्टे त्यांच्या समोर उभे होते. त्यांचे भविष्यकथन चालेले होते. 11 त्यांच्यापैकी एक कनानाचा पुत्र सिद्कीया हा होता. त्याने प्रचंड शक्तीचे प्रतीक अशी लोखंडाची शिंगे केली होती. तो अहाबाला म्हणाला, “परमेश्वराचे म्हणणे हे आहे की ही शिंगे तू अरामी सैन्याविरुध्द लढताना वापरावीस म्हणजे तू शत्रूचा पराभव करशील, त्याचा संहार करशील.” 12 मग ते सर्वच भविष्यवादी भविष्य सांगत होते. पुढे सिद्कीया म्हणाला, “आता तुझ्या सैन्याने चढाई करावी. रामोथ-गिलाद येथे अरामी सैन्यावर हल्ला करावा. विजय तुमचाच आहे. परमेश्वर ते राजाच्या हाती देईल.” 13 हे चाललेले असतानाच एक सेवक मीखायाच्या शोधात गेला व त्यास भेटून म्हणाला, “राजा या युध्दात विजयी होईल असे सर्वच संदेष्ट्यांचे म्हणणे आहे. तेव्हा तूही तसेच म्हणणे श्रेयस्कर ठरेल व ते सुरक्षितपणाचे होईल.” 14 पण मीखाया म्हणाला, “नाही, कदापि नाही. जे परमेश्वर माझ्याकडून वदवतो तेच मी सांगेन. माझी तशी प्रतिज्ञाच आहे.” 15 मीखाया मग राजाकडे आला. राजाने त्यास विचारले, “मीखाया, मी आणि राजा यहोशाफाट हातमिळवणी करु ना? रामोथ-गिलाद अरामाच्या सैन्यावर आता चढाई करु का?” मीखाया म्हणाला, “हो तुम्ही आत्ताच ही लढाई करा. परमेश्वर तुम्हास यश देईल.” 16 पण राजा त्यास म्हणाला, “तू हे परमेश्वराच्या शक्तीने सांगत नाहीस. आपल्या मनाचे सांगतो आहेस. तेव्हा खरे काय ते सांग परमेश्वराचे म्हणणे सांग. अशी शपथ कितीदा मी तुला देऊ?” 17 तेव्हा मीखायाने सांगितले, “काय होणार ते मला दिसते आहे. इस्राएलाचे सैन्य डोंगरांवर इतस्तत: पसरेल. मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखी त्यांची अवस्था होईल. परमेश्वराचे म्हणणे असे आहे, ‘यांना कोणी नेता नाही. यांनी सुखरूप घरी जावे. लढाईच्या भानगडीत पडू नये.” 18 मग इस्राएलाच्या राजा यहोशाफाटाला म्हणाला, “पाहा, हेच बोललो होतो ना मी! हा संदेष्टा कधीही माझ्याबद्दल चांगले भविष्यकथन करत नाही. हा नेहमी अप्रिय गोष्टीच मला ऐकवतो.” 19 इकडे परमेश्वराचे म्हणणे काय आहे ते मीखाया सांगतच होता. मीखाया म्हणाला, “ऐका परमेश्वर काय म्हणतो: ते पाहा परमेश्वर स्वर्गात सिंहासनावर बसलेला मी पाहिला. आकाशातले त्याचे सर्व सैन्य त्याच्या शेजारी उभे आहे. 20 परमेश्वराने म्हटले, ‘अहाब राजाची कोणी फसगत करेल का? त्याने रामोथ-गिलाद वर हल्ला करावा असे मला वाटते. त्यामध्ये त्यास मरण येईल.’ तेव्हा आता काय करावे याबद्दल देवदूतांमध्ये एकमत होईना. 21 मग त्यापैकी एकजण परमेश्वराकडे गेला आणि म्हणाला, ‘मी हे काम करीन.’ 22 परमेश्वर त्यास म्हणाला, ‘तू अहाबाची फसगत कशी करशील?’ यावर तो देवदूत म्हणाला, ‘मी अहाबाच्या संदेष्ट्यांमध्ये गोंधळ माजवून देईन. त्यांना मी राजाशी खोटे बोलायला प्रवृत्त करीन संदेष्टे राजाला सांगतील ते खोटे असेल.’ यावर परमेश्वर म्हणाला, ‘हे चांगले झाले; जा आणि अहाब राजाला या मोहात पाड, तुला यश येईल. 23 मीखायाचे सांगून झाले. मग तो म्हणाला, तेव्हा खरी हकिकत अशी आहे. परमेश्वरानेच तुमच्या संदेष्ट्यांना खोटे बोलायला लावले आहे. तुमच्यावर मोठे संकट ओढवावे असे परमेश्वरास वाटते.” 24 मग कनानाचा पुत्र सिदकीया हा संदेष्टा मीखायाजवळ गेला. मीखायाच्या त्याने तोंडात मारले. सिद्कीया म्हणाला, “माझ्यातली परमेश्वराची शक्ती संपली आहे आणि तो आता तुझ्या मार्फतच बोलतो आहे अशी खरेच तुझी समजूत आहे?” 25 मीखाया म्हणाला, “लवकरच आपत्ती येणार आहे. तेव्हा तू एका लहानशा खोलीत दडून बसशील तेव्हा माझे म्हणणे खरे असल्याचे तुझ्या लक्षात येईल.” 26 तेव्हा इस्राएलच्या राजाने आपल्या एका सेवकाला मीखायाला पकडायचा हुकूम केला. राजा म्हणाला, “याला धरा आणि नगराधिकारी आमोन व राजपुत्र योवाश यांच्याकडे घेऊन जा. 27 आणि त्यांना जाऊन सांगा, राजा म्हणतो, या मनुष्यांस बंदीत टाका व मी सुखरूप परत येईपर्यंत त्यास फक्त भाकर आणि पाणी द्या. युध्दावरुन मी परत सुखरूप येईपर्यंत त्यास तिथेच राहू द्या.” 28 मीखाया मोठ्याने म्हणाला, “मी काय म्हणतो ते सर्व लोकहो ऐका. राजा, तू युध्दावरुन जिवंत परत आलास तर परमेश्वर माझ्या मार्फत बोलला नाही असे खुशाल समजा.” 29 नंतर इस्राएल राजा अहाब आणि यहूदाचा राजा यहोशाफाट रामोथ येथे अरामाच्या सैन्याशी लढायला गेले. रामोथ-गिलाद प्रांतात हे युध्द झाले. 30 अहाब यहोशाफाटाला म्हणाला, “आपण आता युध्दाचा व्यूह रचू. मला राजा म्हणून कोणी ओळखणार नाही असे कपडे मी घालीन. पण तू मात्र राजाला शोभेल असाच पोषाख कर.” अशाप्रकारे इस्राएलाच्या राजाने अगदी चारचौघांसारखे कपडे करून युध्दाला सुरुवात केली. 31 अरामाच्या राजाकडे बत्तीस रथाधिपती होते. त्या राजाने या बत्तीस जणांना इस्राएलाच्या राजाचा शोध घ्यायला सांगितले. राजाला ठार करण्याबद्दल त्याने त्यांना बजावले. 32 तेव्हा युध्द चालू असताना या रथाधिपतींनी राजा यहोशाफाटाला पाहिले. “तोच इस्राएलचा राजा असे त्यांना वाटले.” त्यामुळे त्याचा ते वध करायला निघाले. यहोशाफाट आरडाओरडा करु लागला. 33 हा इस्राएलचा अहाब राजा नव्हे हे त्या रथाधिपतीच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्यास मारले नाही. 34 तेव्हा एका सैनिकाने, कोणावर नेम धरुन नव्हे असा हवेतच एक बाण सोडला. हा बाण नक्की इस्राएलाचा राजा अहाब याला लागला. शरीराचा जो छोटा भाग चिलखताने झाकलेला नव्हता तिथे बाण लागला. तेव्हा राजा अहाब आपल्या सारथ्याला म्हणाला, “मला बाण लागला आहे. रथ येथून हलव. आपण या लढाईपासून दूर जाऊ.” 35 युध्द मात्र चालूच राहिले. राजा अहाब आपल्या रथात बसून राहिला. रथात टेकून बसून तो अरामाच्या सैन्याकडे पाहत होता. त्यास एवढा रक्तस्राव झाला की रथाच्या बैठकीच्या भागात रक्ताचे थारोळे झाले. संध्याकाळच्या सुमारास राजाला मृत्यू आला. 36 सूर्यास्ताच्या वेळी “इस्राएलाच्या सर्वसैन्याला आपापल्या प्रांतात घरोघरी जायचा आदेश मिळाला.” 37 राजा अहाबाला अशा तऱ्हेने मरण आले. काही जणांनी त्याचा देह शोमरोनाला आणला. त्यास त्यांनी तिथे पुरले. 38 शोमरोनमधल्या तळ्यावर या लोकांनी अहाबाच्या रथ धुतला. रथातील रक्त कुत्र्यांनी चाटले आणि त्या तळ्यातील पाण्याने वेश्या स्नान करीत असत. परमेश्वराने जे जे होईल असे सांगितले होते तसेच नक्की घडले. 39 इस्राएलाच्या राजांचा इतिहास या ग्रंथात राजा अहाबाच्या सर्व गोष्टींची नोंद केलेली आहे. आपला महाल सुशोभित करण्यासाठी त्याने हस्तिदंत कसे वापरले, त्याने नगरे उभारली याबद्दलही या ग्रंथात सांगितलेले आहे. 40 अहाब मरण पावला व त्यास त्याच्या पूर्वजांशेजारी दफन करण्यात आले. त्याचा पुत्र अहज्या त्याच्या जागी राजा झाला. 41 अहाब इस्राएलाचा राजा झाल्यावर चौथे वर्ष चालू असताना यहोशाफाट यहूदाचा राजा झाला. यहोशाफाट हा आसाचा पुत्र. 42 यहोशाफाट वयाच्या पस्तीसाव्या वर्षी राजा झाला आणि यरूशलेमामध्ये त्याने पंचवीस वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव अजूबा. ती शिल्हीची कन्या. 43 यहोशाफाट चांगला राजा होता. हा आपले वडिल आसा ह्यांच्याप्रमाणेच वागला. परमेश्वराच्या दृष्टीने जे योग्य ते त्याने केले. पण यहोशाफाटाने उंचावरील पूजास्थळे काढली नाहीत. लोक त्याठिकाणी होम करणे, धूप जाळणे वगैरे करत राहिले. 44 यहोशाफाट राजाने इस्राएलाच्या राजाशी शांततेचा करार केला. 45 राजा यहोशाफाट शूर होता. त्याने बऱ्याच लढाया केल्या. त्याने जे केले त्याची हकिकत यहूदाच्या राजांचा इतिहास या ग्रंथात आहे. 46 त्याचे वडिल आसा राज्य करीत असताना जे पुरुषगमन करणारे राहून गेले होते त्यांना यहोशाफाटाने त्यांना हाकलून लावले. 47 याच काळात अदोम प्रदेशाला राजा नव्हता. एक कारभारीच इथला कारभार पाहत असे. त्याची नेमणूक यहूदाचा राजा करी. 48 राजा यहोशाफाटाने तार्शीशी काही मालवाहू गलबते बांधली. त्यामध्ये त्याचा हेतू ओफिरहून सोने आणण्याचा होता. पण ती तेथपर्यंत कधी पोहोंचू शकली नाहीत कारण एसयोन-गेबेरच्या बंदरात त्यांची नासधूस करण्यात आली. 49 इस्राएलाचा राजा अहाबाचा पुत्र अहज्या याने यहोशाफाटाला मदतीचा हात दिला. “त्याच्या मनुष्यांबरोबर आपले खलाशी देण्याची तयारी दर्शवली.” पण अहज्याची कुमक स्विकारण्यास यहोशाफाटाने नकार दिला. 50 यहोशाफाट मरण पावला त्यानंतर दावीद नगरात आपल्या पूर्वजांबरोबर त्याचे दफन करण्यात आले. त्याच्या जागी त्याचा पुत्र यहोराम राज्य करु लागला. 51 अहज्या अहाबाचा पुत्र होता. यहोशाफाटाच्या यहूदावरील सत्तेच्या सतराव्या वर्षी अहज्या इस्राएलाचा राजा झाला. शोमरोन मध्ये त्याने दोन वर्षे राज्य केले. 52 अहज्याने परमेश्वराचे अनेक अपराध केले. आपले वडिल अहाब, आई ईजबेल आणि नबाटाचा पुत्र यराबाम या सगळ्यांनी जे केले तेच याने केले. या सर्व राज्यकर्त्यांनी इस्राएली लोकांस आणखी पापात लोटले. 53 आपल्या वडिलांप्रमाणेच अहज्यानेही बआल या अमंगळ दैवताची पूजा केली. त्यामुळे इस्राएलचा देव परमेश्वर याचा कोप ओढवला. परमेश्वर अहाबावर संतापला होता तसाच अहज्यावर संतापला.

Turn reading into real study

Sign up to bookmark verses, take notes, and study with AI-powered tools.

Choose your next step after this chapter Keep reading, choose a plan, or keep studying with AI.
Follow the themes this chapter opens Related topic hubs for the larger questions this chapter may have opened.