Genesis 37

Mit KI in dieses Kapitel einsteigen

KI zu diesem Kapitel fragen

Bleib im Text und stelle Fragen zu Verlauf, Spannung, Hintergrund und dem, was dieses Kapitel im größeren Buch aufdeckt.

1 याकोब कनान देशात जेथे त्याचा बाप वस्ती करून राहिला होता त्या देशात राहिला. 2 याकोबासंबंधीच्या घटना या आहेत. योसेफ सतरा वर्षांचा तरुण होता. आपल्या भावांबरोबर तो कळप सांभाळीत असे. तो आपल्या वडिलाच्या स्त्रिया बिल्हा व जिल्पा यांच्या मुलांबरोबर होता. त्या भावांनी केलेल्या वाईट गोष्टीविषयी त्याने आपल्या बापाला सांगितले. 3 इस्राएल सर्व मुलांपेक्षा योसेफावर अधिक प्रीती करीत असे कारण तो त्याचा म्हातारपणाचा मुलगा होता. त्याने योसेफाला एक सुंदर पायघोळ झगा बनवून दिला होता. 4 आपला बाप आपल्या इतर भावांपेक्षा योसेफावर अधिक प्रीती करतो हे त्याच्या भावांना दिसले म्हणून ते त्याचा द्वेष करीत आणि त्याच्याशी प्रेमाने बोलत नसत. 5 योसेफास एक स्वप्न पडले. त्याने ते स्वप्न आपल्या भावांना सांगितले. त्यानंतर तर त्याचे भाऊ त्याचा अधिकच द्वेष करू लागले. 6 तो त्यांना म्हणाला, “मला पडलेले स्वप्न कृपा करून ऐका: 7 पाहा, आपण सर्वजण शेतात गव्हाच्या पेंढ्या बांधण्याचे काम करीत होतो, तेव्हा माझी पेंढी उठून उभी राहिली आणि तुम्हा सर्वांच्या पेंढ्या तिच्या भोवती गोलाकार उभ्या राहिल्या व त्यांनी माझ्या पेंढीला खाली वाकून नमन केले.” 8 हे ऐकून त्याचे भाऊ त्यास म्हणाले, “तू आमचा राजा होऊन आमच्यावर राज्य करणार काय? आणि खरोखर तू आम्हावर अधिकार करशील काय?” त्याच्या या स्वप्नामुळे व त्याच्या बोलण्यामुळे तर त्याचे भाऊ त्याचा अधिकच द्वेष करू लागले. 9 नंतर योसेफाला आणखी एक स्वप्न पडले. तेही त्याने आपल्या भावांना सांगितले. तो म्हणाला, “पाहा, मला आणखी एक स्वप्न पडले: सूर्य, चंद्र व अकरा तारे यांनी मला खाली वाकून नमन केले.” 10 त्याने आपल्या पित्यासही या स्वप्नाविषयी सांगितले. परंतु त्याच्या वडिलाने त्यास दोष देऊन म्हटले, “असले कसले हे स्वप्न आहे? तुझी आई, तुझे भाऊ व मी आम्ही भूमीपर्यंत लवून तुला नमन करू काय?” 11 योसेफाचे भाऊ त्याचा हेवा करीत राहिले. परंतु त्याच्या वडिलाने ही गोष्ट आपल्या मनात ठेवली. 12 एके दिवशी योसेफाचे भाऊ आपल्या बापाची मेंढरे चारावयास शखेम येथे गेले. 13 इस्राएल योसेफाला म्हणाला, “तुझे भाऊ शखेम येथे आपली मेंढरे चारावयास गेले आहेत ना? चल, मी तुला तेथे पाठवत आहे.” योसेफ त्यास म्हणाला, “मी तयार आहे.” 14 तो त्यास म्हणाला, “आता जा आणि तुझे भाऊ व माझी मेंढरे ठीक आहेत सुखरुप आहेत का? ते पाहा व मला त्यांच्यासंबंधी बातमी घेऊन ये.” अशा रीतीने याकोबाने त्यास हेब्रोनातून शखेमास पाठवले आणि योसेफ शखेमास गेला. 15 योसेफ शेतात भटकत होता. पाहा, तो कोणा मनुष्यास दिसला. त्या मनुष्याने त्यास विचारले, “तू काय शोधत आहेस?” 16 योसेफ म्हणाला, “मी माझ्या भावांना शोधत आहे, ते कोठे कळप चारीत आहेत, हे कृपा करून मला सांगता का?” 17 तो मनुष्य म्हणाला, “ते येथून गेले आहेत. आपण दोथान गावामध्ये जाऊ असे त्यांना बोलताना मी ऐकले.” म्हणून मग योसेफ आपल्या भावांच्या मागे गेला व ते त्यास दोथानात सापडले. 18 त्याच्या भावांनी योसेफाला दुरून येताना पाहिले आणि कट करून त्यास ठार मारण्याचे ठरवले. 19 त्याचे भाऊ एकमेकांना म्हणाले, “हा पाहा, स्वप्ने पाहणारा इकडे येत आहे. 20 आता चला, आपण त्यास ठार मारून टाकू आणि त्यास एका खड्ड्यात टाकून देऊ. आणि त्यास कोणा एका हिंस्र पशूने खाऊन टाकले असे आपल्या बापाला सांगू. मग त्याच्या स्वप्नांचे काय होईल ते आपण पाहू.” 21 रऊबेनाने ते ऐकले आणि त्यास त्यांच्या हातातून सोडवले. तो म्हणाला, “आपण त्यास ठार मारू नये.” 22 रऊबेन त्यांना म्हणाला, “रक्त पाडू नका. त्यास रानातल्या या खड्ड्यात टाका, परंतु त्याच्यावर हात टाकू नका.” आपल्या भावांच्या हातातून सोडवून त्यास त्याच्या बापाकडे परत पाठवून द्यावयाचे असा त्याचा बेत होता. 23 योसेफ त्याच्या भावांजवळ येऊन पोहचला तेव्हा त्यांनी त्याचा सुंदर झगा काढून घेतला. 24 नंतर त्यांनी त्यास एका खोल खड्ड्यात टाकून दिले. तो खड्डा रिकामा होता, त्यामध्ये पाणी नव्हते. 25 ते भाकरी खाण्यास खाली बसले. त्यांनी वर नजर करून पाहिले, तो पाहा, इश्माएली लोकांचा तांडा मसाल्याचे पदार्थ व सुगंधी डिंक व बोळ लादलेल्या उंटांसहीत गिलाद प्रदेशाहून येत होता. ते खाली मिसर देशाकडे चालले होते. 26 तेव्हा यहूदा त्याच्या भावांना म्हणाला, “आपल्या भावाला ठार मारून आणि त्याचा खून लपवून ठेवून आपल्याला काय फायदा? 27 चला, आपण त्यास या इश्माएली लोकांस विकून टाकू, आपण आपल्या भावावर हात टाकू नये. कारण तो आपला भाऊ आहे, आपल्याच हाडामांसाचा आहे.” त्याच्या भावांनी त्याचे ऐकले. 28 ते मिद्यानी व्यापारी जवळ आल्यावर त्या भावांनी योसेफाला खड्ड्यातून बाहेर काढले व त्या इश्माएली व्यापाऱ्यांना वीस चांदीची नाणी घेऊन विकून टाकले. ते व्यापारी योसेफाला मिसर देशास घेऊन गेले. 29 रऊबेन त्या खड्ड्याकडे परत गेला, तेव्हा पाहा, त्यामध्ये त्यास योसेफ दिसला नाही. त्याने आपली वस्त्रे फाडली. 30 तो भावांकडे येऊन म्हणाला, “मुलगा कोठे आहे? आणि मी, आता मी कोठे जाऊ?” 31 त्यांनी एक बकरा मारला आणि योसेफाचा झगा त्या रक्तात बुडवला. 32 नंतर तो झगा आणून, आपल्या बापाला दाखवून ते म्हणाले, “आम्हांला हा सापडला. हा झगा तुमच्या मुलाचा आहे की काय तो पाहा.” 33 याकोबाने तो ओळखला आणि तो म्हणाला, “हा माझ्याच मुलाचा झगा आहे. हिंस्र पशूने त्यास खाऊन टाकले असावे. माझा मुलगा योसेफ याला हिंस्त्र पशूने खाऊन टाकले आहे यामध्ये संशय नाही.” 34 याकोबाला आपल्या मुलाबद्दल अतिशय दुःख झाले, एवढे की, त्याने आपली वस्त्रे फाडली आणि कंबरेस गोणताट गुंडाळले आणि त्याने पुष्कळ दिवस आपल्या मुलासाठी शोक केला. 35 याकोबाच्या सर्व मुलांनी व मुलींनी त्याचे सांत्वन करण्याचा खूप प्रयत्न केला परंतु तो समाधान पावला नाही. तो म्हणाला, “मी मरेपर्यंत माझ्या मुलासाठी शोक करीत राहीन व अधोलोकात माझ्या मुलाकडे जाईन.” असा त्याचा बाप त्याच्याकरता रडला. 36 त्या मिद्यानी व्यापाऱ्यांनी योसेफाला मिसर देशात पोटीफर नावाचा फारो राजाचा अधिकारी, अंगरक्षकाचा सरदार याला विकून टाकले.

Mach aus Lesen echtes Bibelstudium

Registriere dich, um Verse zu speichern, Notizen zu machen und mit KI-gestützten Werkzeugen zu studieren.

Nächste Schritte nach diesem Kapitel Weiterlesen, Plan wählen oder mit KI weiterarbeiten.
Folge den Themen, die dieses Kapitel öffnet Verwandte Themenhubs, wenn dieses Kapitel eine größere Frage geöffnet hat.