John 4

Почати цей розділ з AI

Запитати ШІ про цей розділ

Залишайтеся в тексті та запитуйте про рух, напругу, контекст та що розкриває цей розділ у межах більшої книги.

1 येशू योहानापेक्षा अधिक शिष्य करून त्यांचा बाप्तिस्मा करीत आहे हे परूश्यांच्या कानी गेले आहे असे जेव्हा प्रभूला कळले. 2 (तरी, येशू स्वतः बाप्तिस्मा करीत नव्हता पण त्याचे शिष्य करीत होते) 3 तेव्हा तो यहूदीया प्रांत सोडून पुन्हा गालील प्रांतात गेला. 4 आणि त्यास शोमरोन प्रांतातून जावे लागले. 5 मग तो शोमरोन प्रांतातील सूखार नावाच्या नगरास आला. ते याकोबाने आपला मुलगा योसेफ याला दिलेल्या शेताजवळ होते. 6 तेथे याकोबाची विहीर होती. म्हणून प्रवासाने दमलेला येशू तसाच त्या विहिरीजवळ बसला, तेव्हा सुमारे दुपारचे बारा वाजले होते. 7 तेथे एक शोमरोनी स्त्री पाणी काढाण्यास आली. येशू तिला म्हणाला, “मला प्यायला दे.” 8 कारण त्याचे शिष्य गावात अन्न विकत घ्यायला गेले होते. 9 तेव्हा ती शोमरोनी स्त्री त्यास म्हणाली, “आपण यहूदी असून माझ्यासारख्या एका शोमरोनी स्त्रीजवळ प्यायला पाणी मागता हे कसे?” कारण यहूदी शोमरोनी लोकांबरोबर कोणतेही व्यवहारीक संबंध ठेवत नव्हते. 10 येशूने तिला उत्तर दिले, “देवाचे दान म्हणजे काय आणि मला प्यायला दे असे तुला म्हणणारा कोण आहे, हे तुला समजले असते तर तू त्याच्याजवळ मागितले असतेस आणि त्याने तुला जिवंत पाणी दिले असते.” 11 ती स्त्री त्यास म्हणाली, “साहेब, पाणी काढायला आपल्याजवळ काही नाही व विहीर तर खोल आहे, मग आपल्याजवळ ते जिवंत पाणी कोठून? 12 आमचा पूर्वज याकोब याने ही विहीर आम्हास दिली, तो स्वतः, त्याचे पुत्र व त्याची गुरेढोरे हिचे पाणी पीत असत. त्याच्यापेक्षा आपण मोठे आहात काय?” 13 येशूने तिला उत्तर दिले, “जो कोणी हे पाणी पिईल त्यास पुन्हा तहान लागेल, 14 परंतु मी देईन ते पाणी जो कोणी पिईल त्यास कधीही तहान लागणार नाही. जे पाणी मी त्यास देईन ते त्यांच्यामध्ये सार्वकालिक जीवनासाठी उपळत्या पाण्याचा झरा होईल.” 15 ती स्त्री त्यास म्हणाली, “साहेब, मला तहान लागू नये व पाणी काढायला मला येथवर येणे भाग पडू नये म्हणून ते पाणी मला द्या.” 16 येशू तिला म्हणाला, “जा, तुझ्या पतीला बोलावून आण.” 17 ती स्त्री म्हणाली, “मला पती नाही.” येशूने तिला म्हटले, “तू ठीक बोललीस की, ‘तुला पती नाही;’ 18 कारण तुला पाच पती होते आणि तुझ्याजवळ आता आहे तो तुझा पती नाही, हे तू खरे बोललीस.” 19 ती स्त्री त्यास म्हणाली, “साहेब, आपण संदेष्टे आहात हे आता मला समजले. 20 आमच्या पूर्वजांनी याच डोंगरावर उपासना केली आणि तुम्ही म्हणता की, जिथे उपासना केली पाहिजे ते स्थान यरूशलेम शहरात आहे.” 21 येशू तिला म्हणाला, “मुली, माझ्यावर विश्वास ठेव की अशी घटका येत आहे; तुम्ही या डोंगरावर किव्हा यरूशलेम शहरात पित्याची उपासना करणार नाही, 22 तुम्ही ज्याला ओळखीत नाही अशाची उपासना करता; आम्हास ठाऊक आहे अशाची उपासना आम्ही करतो, कारण यहूद्यांतूनच तारण आहे. 23 तरी खरे उपासक आत्म्याने व खरेपणाने स्वर्गीय पित्याची उपासना करतील अशी वेळ येत आहे, किंबहुना आलीच आहे; कारण आपले उपासक असेच असावेत, अशी पित्याची इच्छा आहे. 24 देव आत्मा आहे; आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे.” 25 ती स्त्री त्यास म्हणाली, “मी जाणते की, मसीहा ज्याला ख्रिस्त म्हणतात तो येणार आहे, हे मला माहित आहे. तो येईल तेव्हा तो सर्व गोष्टी सांगेल.” 26 येशू तिला म्हणाला, “तुझ्याशी बोलणारा मीच तो आहे.” 27 इतक्यात त्याचे शिष्य आले आणि तो एका स्त्रीबरोबर बोलत आहे याचे त्यांना आश्चर्य वाटले, तरी कोणी असे म्हणले नाही की, “आपण काय विचारत आहात?” किंवा “आपण तिच्याशी का बोलत आहात?” 28 ती स्त्री तेव्हा आपला पाण्याचा घडा तेथेच टाकून नगरात गेली आणि लोकांस म्हणाली, 29 “चला, मी केलेले सर्वकाही ज्याने मला सांगितले, तो मनुष्य पाहा, तोच ख्रिस्त असेल काय?” 30 तेव्हा ते नगरातून निघून त्याच्याकडे येऊ लागले. 31 त्याचे शिष्य त्यास विनंती करून म्हणाले, “रब्बी, काहीतरी खाऊन घ्या.” 32 पण तो त्यांना म्हणाला, “तुम्हास माहीत नाही असे अन्न माझ्याजवळ खायला आहे.” 33 यावरुन शिष्य एकमेकांस म्हणू लागले, “ह्याला कोणी खायला आणून दिले असेल काय?” 34 येशू त्यांना म्हणाला, “ज्याने मला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे व त्याचे कार्य सिद्धीस न्यावे हेच माझे अन्न आहे. 35 अजून चार महिन्यांचा अवकाश आहे, मग कापणी येईल, असे तुम्ही म्हणता की नाही? पाहा, मी तुम्हास म्हणतो, आपली नजर वर करून शेते पाहा; ती कापणीसाठी पांढरी होऊन चुकली आहेत. 36 कापणारा मजुरी मिळवतो व सार्वकालिक जीवनासाठी पीक गोळा करतो; यासाठी की पेरणाऱ्याने व कापणी करणाऱ्यानेही एकत्र आनंद करावा. 37 ‘एक पेरतो आणि दुसरा कापतो’, अशी जी म्हण आहे ती या बाबतीत खरी आहे. 38 ज्यासाठी तुम्ही कष्ट केले नाहीत ते कापायला मी तुम्हास पाठवले. दुसर्‍यांनी कष्ट केले होते व तुम्ही त्यांच्या कष्टात वाटेकरी झालेले आहात.” 39 “मी केलेले सर्वकाही त्याने मला सांगितले” अशी साक्ष देणाऱ्या त्या स्त्रीच्या बोलण्यावरून त्या नगरातल्या पुष्कळ शोमरोनी लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. 40 म्हणून शोमरोनी त्याच्याकडे आल्यावर, त्यांनी त्यास आपल्याबरोबर रहायची विनंती केली; मग तो तेथे दोन दिवस राहिला. 41 आणखी कितीतरी लोकांनी त्याच्या वचनावरून विश्वास धरला. 42 आणि ते त्या स्त्रीला म्हणाले, “आता तुझ्या बोलण्यावरूनच आम्ही विश्वास धरतो असे नाही, कारण आम्ही स्वतः ऐकले आहे व हा खरोखर जगाचा तारणारा आहे, हे आम्हास समजले आहे.” 43 मग त्या दोन दिवसानंतर, तो तेथून गालील प्रांतात निघून गेला. 44 कारण येशूने स्वतः साक्ष दिली की, संदेष्ट्याला स्वतःच्या देशात मान मिळत नाही. 45 म्हणून तो गालील प्रांतात आल्यावर गालीलकरांनी त्याचे स्वागत केले; कारण त्याने सणात यरूशलेम शहरात केलेल्या सर्व गोष्टी त्यांनी पाहिल्या होत्या; कारण तेही सणाला गेले होते. 46 नंतर तो गालील प्रांतातील काना नगरात पुन्हा आला. तेथे त्याने पाण्याचा द्राक्षरस केला होता. त्या स्थळी कोणीएक अंमलदार होता, त्याचा मुलगा कफर्णहूमात आजारी होता. 47 येशू यहूदीया प्रांतातून गालील प्रांतात आला आहे हे ऐकून तो त्याच्याकडे गेला आणि त्याने खाली येऊन आपल्या मुलाला बरे करावे अशी त्याने विनंती केली कारण तो मरायला टेकला होता. 48 त्यावर येशू त्यास म्हणाला, “तुम्ही चिन्हे आणि अद्भूते बघितल्याशिवाय विश्वास ठेवणारच नाही.” 49 तो अंमलदार त्यास म्हणाला, “प्रभूजी, माझे मूल मरण्यापूर्वी आपण खाली येण्याची कृपा करा.” 50 येशू त्यास म्हणाला, “जा, तुमचा मुलगा वाचला आहे.” तेव्हा तो मनुष्य, त्यास येशूने म्हटलेल्या वचनावर विश्वास ठेवून, आपल्या मार्गाने निघून गेला. 51 आणि तो खाली जात असता त्याचे दास त्यास भेटून म्हणाले, “आपला मुलगा वाचला आहे.” 52 तेव्हा केव्हापासून त्याच्यात सुधारणा होऊ लागली म्हणून त्याने त्यांना प्रश्न केला आणि ते त्यास म्हणाले, “काल, दुपारी एक वाजता त्याचा ताप गेला.” 53 यावरुन ज्या ताशी येशूने त्यास सांगितले होते की, “तुमचा मुलगा वाचला आहे,” त्याच ताशी हे झाले असे पित्याने ओळखले आणि त्याने स्वतः व त्याच्या सर्व घराण्याने विश्वास ठेवला. 54 येशू यहूदीया प्रांतातून गालील प्रांतात आल्यावर त्याने पुन्हा जे दुसरे चिन्ह केले ते हे.

Перетворіть читання на справжнє вивчення

Зареєструйтеся, щоб зберігати вірші, робити нотатки та вивчати за допомогою ШІ.

Оберіть наступний крок після цього розділу Продовжуйте читати, оберіть план або продовжуйте вивчення з AI.
Слідуйте темами, які відкриває цей розділ Пов'язані тематичні центри для більших запитань, які міг відкрити цей розділ.